परभणी -पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकला. शहरातील उच्चभ्रू वसाहतीत हा जुगार अड्डा सुरू होता. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मध्यरात्री धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली आहे. या जुगाऱ्यांकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, असा एकूण 3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैद्य धंदे चालकांचे धाबे दणाणले-
महिनाभरापूर्वी रूजू झालेले पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गुटखा आणि वाळू माफियांसह अवैद्य धंदे चालकांवर कारवाईचा फास आवळला आहे. त्यांची नजर आता परभणी जिल्ह्यात चालणाऱ्या जुगार अड्डे आणि मटका बुकी चालकांकडे वळली आहे. त्यानुसार कारवाईचा धडाका सुरू झाला असून अवैद्य धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळण्यात येत होता-
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील शिवराम नगर परिसरात हा छापा टाकला. शिवराम नगरातील गोविंद काकडे यांच्या घरात चालणाऱ्या या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर 'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळण्यात येत होता.