महाराष्ट्र

maharashtra

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्‍याकरिता सोयाबीनची उत्‍पादकता वाढविणे गरजेचे - कृषीमंत्री दादाजी भुसे

By

Published : Aug 21, 2020, 10:01 PM IST

सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पिक असून शेतकरी बांधवाचे जीवनमान उंचावण्‍याकरिता सोयाबीनची उत्‍पादकता वाढविणे गरजेचे आहे. याकरिता सोयाबीन बियाणे निवड, उगवणक्षमता तपासणी, पेरणीपासुन ते काढणीपर्यंत तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आदी विषयीचे सर्वकष माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

agriculture-minister-dadaji-bhuse
कृषीमंत्री दादाजी भुसे

परभणी - सोयाबीन हे महाराष्‍ट्रातील कापसानंतर दोन क्रमांकाचे महत्‍वाचे पिक असून, मराठवाडा व विदर्भातील शेतकरी बांधवाचे जीवनमान उंचावण्‍याकरिता सोयाबीनची उत्‍पादकता वाढविणे गरजेचे आहे. याकरिता सोयाबीन बियाणे निवड, उगवणक्षमता तपासणी, पेरणीपासुन ते काढणीपर्यंत तसेच काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आदी विषयीचे सर्वकष माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन व नाहेप प्रकल्‍प यांच्या संयुक्त विद्यमाने 19 ते 21 ऑगस्ट दरम्‍यान तीन दिवसीय ऑनलाईन सोयाबीन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते, तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, सोयाबीन संशोधन प्रकल्‍पाचे डॉ.एस.पी.म्‍हेत्रे, विस्‍तार कृषि विद्यावेता डॉ.उद्धव आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दादाजी भुसे पुढे म्‍हणाले की, पुढील वर्षी शेतकरी बांधवाना घरचे बियाणे ठेवण्‍याकरिता त्‍यांची काढणी व काढणी पश्‍चात हाताळणी याबाबत याच वर्षी काढणीच्‍या वेळी मार्गदर्शन करावे. पेरणीच्‍या वेळी बियाणे 5 सेंमी पेक्षा जास्‍त खोल पडले नाही पाहिजे, यांची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. पेरणी बीबीएफ पध्‍दतीने केल्‍यास निश्चितच उत्‍पादनात वाढ होते. शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यानी दर्जेदार बियाणे निर्माण करून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. केवळ सोयाबीन उत्‍पादकतेत वाढीवर भर न देता, त्‍यांचे विपणन तसेच मराठवाडयात सोयाबीन प्रक्रिया उद्योगात वाढीसाठी प्रयत्‍न केला जाईल. सदरील तीन दिवसीय कार्यशाळेत जे निष्‍कर्ष आहेत, त्‍यांचा शासनस्‍तरावर विचार करून अंमलबजावणी करण्‍यात येईल. पुढील वर्षी सोयाबीन पिकाचे 25 ते 30 टक्के उत्‍पादन वाढीचे उद्दीष्‍ट ठेऊन राज्याचा कृषि विभाग, कृषि विद्यापीठे, शेतकरी उत्पादक कंपन्या, सोयाबीन प्रक्रिया उद्योजक, प्रगतशील शेतकरी आदींनी ए‍कत्रित प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी व शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍याना दर्जेदार पायाभुत व प्रमाणित बियाणे पुढील हंगामात उपलब्‍ध करून देण्‍याकरिता विद्यापीठाने सोयाबीन बीजोत्‍पादनाचा महत्‍वकांक्षी उपक्रम हाती घेतला असल्‍याचे सांगितले. १९ ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते झाले. तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेत सोयाबीन पिकाचे वाण व बीज उत्पादन तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, उगवणशक्ती, जिवाणू खतांचा वापर, आधुनिक लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, आयात-निर्यात धोरण, विक्री व बाजार व्यवस्थापन, शासकीय खासगी सहभाग, पीपीपी, प्रक्रिया उद्योग आदीं विषयावर डॉ.एस.पी.म्हेत्रे, डॉ.गोदावरी पवार, डॉ.उद्धव आळसे, डॉ.आर.एस. जाधव, डॉ.सी.व्ही. अंबाडकर, डॉ.स्मिता खोडके, डॉ.आर.व्ही. चव्हाण, डॉ.अे.व्ही. गुटटे, डॉ.एस.बी. पवार, अनंत गायकवाड, वैभव कहाते, डॉ.पी.एस.लहाने, संतोष आळसे, के.आर.सराफ आदींनी मार्गदर्शन केले.

तसेच कार्यशाळेत प्रगतशील शेतकरी दिलीप अंभारे, अॅड. अमोल रणदिवे व शेषेराव निरस यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकऱ्यांचे सोयाबीन बाबतच्या समस्यांवर चर्चा केली.दरम्यान, कार्यशाळेत झालेल्‍या चर्चाच्‍या आधारे सोयाबीन पिकाचे वाण, बिजप्रक्रिया, पेरणी, कीड व रोगनियंत्रण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, सोयाबीन प्रक्रिया आदी संदर्भात विविध शिफारशीचे सादरिकरण प्रा.अरूण गुट्टे यांनी केले. प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ.डी.बी. देवसरकर यांनी कार्यशाळेचे प्रायोजन विषद केले. सुत्रसंचलन डॉ.प्रविण कापसे तर आभार डॉ.विश्वनाथ कांबळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात डॉ.गोपाळ शिंदे, डाॅ.वसंत सुर्यवंशी, डॉ.किशोर झाडे, डॉ.अजय किनखेडकर, डॉ.सचिन सोमवंशी, डॉ.दिगांबर पटाईत, प्रा.वसंत ढाकणे व डॉ.संतोष चिक्षे यांनी सहभाग घेतला

ABOUT THE AUTHOR

...view details