परभणी -पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सोनपेठ शहरात गेल्या अनेक महिन्यांत झालेल्या चोऱ्यांचा तपास लागला नाही. परिणामी, दिवसेंदिवस चोरट्यांचे मनोबल वाढत असून चोरीच्या घटना सतत घडत आहेत. यामुळे दहशतीखाली असल्याचे सोनपेठवासियांनी सांगितले. या सर्व प्रकाराला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असून या विरोधात आज (गुरुवारी) सोनपेठ शहरात कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आल्याचे गावकरी म्हणाले.
हेही वाचा - नांदेडमध्ये गोवा बनावटीची 12 लाखांची अवैध दारू जप्त, ५ जणांना अटक
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे शहरातील व्यापाऱ्यांनी यापूर्वीच सोनपेठ बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार गुरुवारी बंद पाळून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सोनपेठ शहरात एप्रिल महिन्यापासून छोट्या-मोठ्या चोऱ्या सातत्याने होत आहेत. घरफोडी किंवा मार्केटमधील दुकानात अनेक चोऱ्या झाल्या आहेत. परंतु, आजपर्यंत एकाही चोरी प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही.
चार दिवसापूर्वीच राजाभाऊ कदम नगरमध्ये साठे यांच्या घरी चोरी झाली. तर विटा रोडवर शाम पांपटवार यांच्या दुकानावर देखील मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. तसेच आण्णाभाऊ साठे चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या नागरे यांच्या दुकानांत चोरी झाली. याशिवाय राजेभाऊ कराड यांच्या किराणा दुकानातून व रघुवीरसिंग शाहू यांच्या दुकानातून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात माल लंपास केला. तसेच किरण चौलवार यांचे शेळगांव रोडवरील गोदामात, गजानान लांडे यांचे कापड दुकानात, मदनराव लांडे किराणा दुकानातसुद्धा चोरी झाली आहे.