परभणी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन तसेच नागरिकांकडून देखील विविध प्रयोग होत आहेत. या अंतर्गत 'सोशल-डिस्टंसींग'चा अवलंब करण्यासाठी परभणी बाजारपेठेत एक मीटर अंतरावर आखणी करून देण्यात आली आहे. शहरातील भाजीमंडई, विविध ठिकाणच्या किराणा दुकान तसेच मेडिकल आणि बँकांसमोर ही आखणी केल्याचे दिसून येत आहे. नागरिकही शिस्तीत या आखणीमध्ये उभे राहून आवश्यक त्या गोष्टी खरेदी करताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होवू नये, यासाठी जनतेला सोशल डिस्टन्सींगचे महत्व पटवून दिले जात आहे.