परभणी - जिल्ह्यातील सेलू येथे एका पंपावर दिवसभराचे काम करून रात्रीच्या वेळी गाढ झोपलेल्या कर्मचाऱ्यांची एका भल्यामोठ्या सापाने अक्षरशः झोप उडवली. या सापाने एका कर्मचाऱ्याच्या चक्क मानेखालून अंथरुणात घुसण्याचा प्रयत्न करताच तो कर्मचारी ताडकन उठून बसला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकारामुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत.
अंथरुणात साप शिरल्याने गोंधळ
परभणी जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीखाली वास्तव्य करणारे प्राणी बाहेर पडत आहेत. त्यात प्रामुख्याने साप बिळाबाहेर पडत आहेत. दरम्यान, सेलू येथील एका पेट्रोल पंपावर दिवसभराच्या कामानंतर सर्जेराव थोरात आणि बालाजी तेलमोटे हे दोन कर्मचारी केबिनमध्ये रात्रीच्यावेळी गाढ झोपले होते. तेव्हा पहाटे पावणे तीनच्या सुमारास सुमारे सहा ते सात फूट लांब साप त्यांच्या केबिनमध्ये शिरला.
सापाने एका कर्मचाऱ्याच्या हातावरून रांगत जाऊन दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या मानेखालून त्याच्या अंथरुणात घुसण्याचा प्रयत्न केल्याने कर्मचाऱ्याला तत्काळ जाग आली. तो भला मोठा साप पाहून ताडकन उठून बसला. या गडबडीत सापाने फणा काढला आणि कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर साप केबिनमधील एका कपाटाखाली लपला.
दरम्यान कर्मचाऱ्यांनी सेलू येथील काही सर्पमित्रांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली. सकाळी तो साप सोयाबीन मधून निघून गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
हा सर्व प्रकार पंपावरील केबिनमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामध्ये फणा काढून बसलेला साप स्पष्ट दिसून येतो. हे दृश्य पाहून कोणीही घाबरल्याशिवाय राहणार नाही. सदर प्रकारामुळे कर्मचारीही प्रचंड भयभीत झाले आहेत.