परभणी - नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनात पार पडला. या सोहळ्यादरम्यान जिंतूर येथील भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शपथ पूर्ण केल्यानंतर 'जय श्रीराम'चा नारा दिला, तर गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी 'जय भगवानबाबा' म्हणून आपली शपथ पूर्ण केली. याशिवाय, पाथरीचे काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर आणि परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आहे तोच मजकूर वाचून शपथ घेतली.
यावेळी, कारागृहातून निवडणूक लढवून विजयी होणारे रत्नाकर गुट्टे हेदखील शपथविधीसाठी पोहोचले होते. जिल्ह्यातील दोन आमदार सत्तेत सहभागी होणार असून, दोन विरोधी बाकावर बसणार आहेत. डॉ. राहुल पाटील आणि सुरेश वरपुडकर हे सत्तेत सहभागी होतील. तर, मेघना साकोरे-बोर्डीकर रत्नाकर गुट्टे दोघे मात्र विरोधी बाकावर बसतील.