महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यातील १६ गावे ८ दिवसांपासून अंधारात; ग्रामस्थ संतापले - loadshading

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील १६ गावे गेल्या ८ दिवसांपासून अंधारात चाचपडत आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज सेवा खंडीत झाली होती ती अजूनही पुर्ववत झालेली नाही.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 25, 2019, 1:11 PM IST

परभणी - महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील १६ गावे गेल्या ८ दिवसांपासून अंधारात चाचपडत आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज सेवा खंडीत झाली होती ती अजूनही पुर्ववत झालेली नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करत आहेत.

महावितरण परभणी कार्यालय

जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे, वझर परिसरात १७ एप्रिलला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात वझर येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावरील विजेचे ५० खांब तर गावठाण लाईनवरील ४५ खांब उन्मळून पडले. त्यामुळे सावंगी भांबळे, वझर, सायखेडा, उमरद, बेलखेडा, कवडा, धमधम, असोला, कोरवाडी, संक्राळा, कोलपा, कुंभेफळ, बनबरडा, कुटे वझर, पिंपरी, बरडा आदी १६ गावात अंधार पसरला आहे.

या घटनेला ८ दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप एकाही गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून १६ गावांतील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. तसेच पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. पायपीट करावी लागत आहे. याचे कोणतेही सोयरसूतक महावितरण कंपनीला नाही. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या वीज खाबांची तत्काळ दुरुस्ती करावी आणि खंडीत झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. तसेच प्रचंड तापमान असल्याने दिवसासुद्धा घामाच्या धारा वाहत असून त्याचबरोबर या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासह दळणाचा प्रश्न देखील गंभीर होत आहे.

"महसूल प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष"

दरम्यान, सावंगी भांबळे येथे १७ एप्रिलला झालेल्या वादळी वाऱ्यात गावातील परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भिंती पडून मोठे नुकसान झाले. तसेच ग्यानोजी मोरे (७०) यांचा मृत्यू झाला. एवढे होऊनही महसूल प्रशासन मात्र, गावाकडे आठ दिवसांचा कालावधी उलटूनही फिरकले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी सावंगी येथील घटनेचा पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details