परभणी- कोरोनासारख्या आपत्तीजनक परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, असे असताना परभणी रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार गेल्या दोन महिन्यात अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. अनेक पक्ष, संघटनांनी या संदर्भात तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
नियुक्त अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असून रुग्णांच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे हे कोरोना आपत्ती व्यवस्थापनात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे. भाजपसह राष्ट्रवादी आणि इतर काही संघटना आणि पक्षांनी हा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना या ठिकाणाहून थेट पदमुक्त करावे, अशी मागणी या पक्षांनी केली. तसेच नागरगोजे यांचा केवळ निधीवर डोळा असतो, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला.
परभणी जिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था सुरुवातीच्या दीड महिन्याच्या काळात करण्यात आली नव्हती. आजही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या रुग्णांची कुठलीही सोय होत नाही. निकृष्ट जेवण मिळते. तसेच त्यांना औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनीदेखील जिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे यांना घेराव घालून धारेवर धरले होते