महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीवर सूर्य कोपला;  जिल्ह्यात उष्माघाताच्या बळींची संख्या ६ वर

परभणी शहरात  सध्या उष्णतेची लाट गेल्या महिनाभरापासून कायम आहे. यापूर्वीही उष्माघाताने बळी घेतले आहेत. काहींची नोंद झाली आहे. तर काही नोंदी अद्यापही झालेल्या नाहीत.

मृत सुशील बालाप्रसाद सारडा

By

Published : Jun 2, 2019, 11:48 PM IST

परभणी - उष्णतेच्या लाटेमुळे मराठवाडा आणि विदर्भ अक्षरश: होरपळत आहे. परभणीमध्ये मे महिन्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर तापमानाचा पारा ४४ अंशांवर स्थिरावला असून, यामुळे उष्णतेचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. परिणामी, जिल्ह्यात उष्माघाताच्या बळीची संख्या आता ६ झाली आहे.

परभणी तहसील कार्यालय परिसरात उष्माघातामुळे एका भावी अंशकालीन कर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच मानवत तालुक्यातील मानोली येथील युवा शेतकरी सुशील बालाप्रसाद सारडा (३२) याचा उष्माघाताने बळी गेला आहे. सुशील याचे वडिलांचे ८ महिन्यापूर्वीच निधन झाले असतानाच सुशीलच्या निधनाने संपूर्ण परिवारावर दु: खाचा डोंगर कोसळला असून या घटनेबद्दल मानवत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

उन्हाचा पारा वाढत आहे.

सुशील सारडा हा भर उन्हामध्ये शेतात पाईपलाईनचे काम करत होता. दररोजच्या उन्हाच्या झळा सहन न झाल्याने त्यास अस्वस्थ वाटू लागले. अचानक काल रात्री ताप, उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने त्याला मानवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असत्याने डॉक्टरांनी त्यास परभणीला हलविण्याचा सल्ला दिला. परभणी येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे आहे त्या अवस्थेत नांदेड येथे हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा उष्माघाताने अखेर बळी घेतला.

दरम्यान, परभणी शहरात सध्या उष्णतेची लाट गेल्या महिनाभरापासून कायम आहे. यापूर्वीही उष्माघाताने बळी घेतले आहेत. काहींची नोंद झाली आहे. तर काही नोंदी अद्यापही झालेल्या नाहीत. परभणी तहसील कार्यालयाच्या परिसरातच शुक्रवारी रवींद्र चव्हाण या ४८ वर्षाच्या एका भावी अंशकालीन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. तसेच याच आवठड्यात चारठाणा येथील कुंडलीक भीवाजी खाडे (६०) यांचा हेअर कटींग दुकानात नेहमीप्रमाणे काम करत असताना उष्माघाताच्या त्रासामुळे मृत्यू झाला.

जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथे ९ मे रोजी बापूराव राघोजी वाघमारे हे ७० वर्षीय शेतकरी शेतात भर उन्हात काम करत असताना त्यांना उन्हाचे चटके सहन न झाल्याने ताप येवून त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच २६ एप्रिलला सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव येथे सोमेश्वर रघुनाथ सपकाळ (४२) यांचा मृत्यू शेतात दिवसभर उन्हात काम केल्यामुळे झाला होता. गंगाखेड येथे प्रवास करून आलेले रेणापूर तालुक्यातील पंढरीनाथ किशनराव कांबळे यांचा उन्हाचा तडाखा सहन न झाल्यामुळे उष्माघाताने मृत्यू झाला. ही जिल्ह्यातील उष्माघाताची पहिली घटना होती.

अजूनही उष्णतेची तीव्रता कमी झालेली नाही, त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडू नये, सतत पाणी प्यावे, ताप, खोकला, सर्दी असा कुठलाही त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे, असा सल्ला तज्ञ मंडळी देत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details