परभणी - शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत 6 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण बळींची संख्या 39 वर गेल्याने परभणीकरांची चिंता वाढली आहे. शिवाय 24 तासात 51 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यासह जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता सातशेच्या घरात जाऊन पोहोचली आहे. या दरम्यान, मात्र एकाही कोरोनाग्रस्ताला सुट्टी मिळाली नाही.
परभणी जिल्हात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोंद रविवारी रात्री उशिरापर्यंत झाली आहे. यामध्ये परभणी शहरातील यशवंत नगरातील 39 वर्षीय पुरूष, कडबी मंडईतील 60 वर्षीय महिला तर पालमच्या दत्तनगरातील 70 वर्षीय पुरूष व पाथरी येथील 66 वर्षीय महिला तसेच परभणी येथील खासगी रुग्णालयात ढवळकेवाडी (ता.गंगाखेड) येथील 65 वर्षीय आणि जिंतूर येथील अर्बन कॉलनीतील 80 वर्षीय कोरोनबाधित पुरूषाचा समावेश आहे.
या प्रमाणेच जिल्ह्यात दिवसेदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शिवाय रॅपिड अँटिजेन तपासणीत नवीन 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशा एकूण 51 बाधितांची भर पडली. यामध्ये परभणी शहरातील अजिंठा नगर हडकोतील 35 वर्षीय महिला, स्वच्छता कॉलनीतील 38 वर्षीय महिला, ज्ञानेश्वर नगरातील 33 वर्षीय महिला, जिंतूर रस्त्यावरील 30 वर्षीय महिला, लोकमान्य नगरातील 60 वर्षीय व 21 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय महिला व 2 वर्षाची मुलगी, भीमनगरातील 25 वर्षीय महिला, अनुसया नगरातील 63 वर्षीय पुरूष, रमाबाई नगरातील 37 वर्षीय महिला, खानापूरातील 34 वर्षीय पुरूष, यशवंत नगरातील 39 वर्षीय पुरूष, कडबी मंडईतील 60 वर्षीय महिला, पाथरी येथील गौतम नगरातील 49 वर्षीय महिला, मानवत शहरातील एकता नगरातील 40 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरूष असे एकूण 11 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 693 एवढा झाला आहे. तर आतापर्यंत 392 जण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 39 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार उर्वरीत 262 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार सुरू आहेत.
गेल्या चार महिन्यात एकूण 4 हजार 673 संशयित रुग्ण दाखल झाले असून, सध्या संसर्गजन्य कक्षात 291 दाखल आहेत. तर विलगीकरण कक्षात 664 जण ठेवण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी 3 हजार 718 जणांनी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण 5 हजार 84 संशयितांचे स्वॅब घेतले आहेत. त्यातील 4 हजार 169 स्वॅब निगेटीव्ह असून, 693 स्वॅब पॉझीटिव्ह आले आहेत. तर 128 स्वॅब अनिर्णायक आणि 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत. तसेच अजूनही 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.