परभणी - लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीची यशस्वी बोलणी झाल्याने परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. असे असले तरी गेल्या ३ वर्षांपासून लोकसभेसाठी सक्रिय झालेल्या भाजपच्या युवानेत्या मेघना बोर्डीकर या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराला त्यांचे आव्हान असेल, तर दुसरीकडे वंचित आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवाराचा मोठा परिणाम राष्ट्रवादीच्या उमेदवारावर होण्याची शक्यता आहे.
परभणी लोकसभेसाठी भाजपच्या इच्छुकांनी केलेली मोर्चे बांधणी निष्फळ ठरली. मुंबईत झालेल्या शिवसेना-भाजपच्या युतीमुळे परभणी लोकसभेसाठी विद्यमान शिवसेनेचा उमेदवार निश्चित आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व मेघना बोर्डीकर यांचे सेनेपुढील आव्हान संपुष्टात आले आहे. राज्यात २५ जागांवर भाजप तर २३ जागा शिवसेना लढवणार आहे. त्यात दोन्ही पक्षांच्या विद्यमान जागा कायम राहतील. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभेत सेनेचा उमेदवार कायम राहणार आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात १९५७ ते १९७७ पर्यंत काँग्रेसच्या खासदाराने प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर १९७७ मध्ये या मतदार संघात शेकापचे शेषराव देशमुख खासदार म्हणून विजयी झाले. पुन्हा १९८० पासून काँग्रेसच्या खासदारांची परंपरा सुरु झाली. सलग दोनवेळा काँग्रेसचे खासदार या मतदार संघात विजयी झाले. त्यानंतर ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देऊन मराठवाड्याच्या राजकारणात प्रवेश केलेल्या शिवसेनेला या मतदार संघात यश आले. हे यश सलग तीन कार्यकाळ अबाधित राहीले. मात्र १२ व्या लोकसभेत या मतदार संघात मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. परंतु तो कार्यकाळ केवळ १३ महिन्यांचा ठरला. परत १३ व्या लोकसभेपासून ते आजतागायत या मतदार संघात शिवसेनेचे खासदार विजयी होत आले आहेत.
सलग ३० वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी - काँग्रेस सज्ज आहेत. शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणाऱ्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नावाची आता औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यांनी गेल्या महिनाभरापासून प्रचारास सुरुवात देखील केली आहे.