महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना खासदारावर जमीन हडपल्याचा आरोप; परभणीतील कुटुंब न्यायासाठी जाणार 'मातोश्रीवर'

परभणी येथून 20 किलोमीटरवर असलेल्या झिरो फाटा येथील सुमारे पावणेचार एकर जमीन खरेदी प्रकरणात खासदार संजय जाधव यांनी संबंधित काळे कुटुंबाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. खासदार जाधव यांनी हा आरोप फेटाळले आहे.

By

Published : Jan 17, 2021, 8:44 PM IST

Land grabbing case Parbhani
जमीन हडप प्रकरण परभणी

परभणी -परभणी येथून 20 किलोमीटरवर असलेल्या झिरो फाटा येथील सुमारे पावणेचार एकर जमीन खरेदी प्रकरणात खासदार संजय जाधव यांनी संबंधित काळे कुटुंबाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र, खासदार संजय जाधव यांनी हा आरोप फेटाळून लावत, आपण ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, ते पुढे येत नसून त्यांचे कुटुंब मला ब्लॅकमेल करत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता संबंधित कुटुंबातील महिलांनी न्याय मिळविण्यासाठी थेट 'मातोश्री' वर धाव घेणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन काळे कुटुंबीयातील महिलांनी आपली बाजू मांडली.

माहिती देताना काळे कुटुंब, शिवसैनिक सुहास देशमुख आणि खासदार संजय जाधव

नेमके काय आहेत आरोप

मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक रामप्रसाद काळे यांच्याकडून खासदार संजय जाधव यांनी आपल्या पत्नीच्या नावे पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथे 3 एकर 35 गुंठे एवढी जमीन खरेदी केली आहे. मात्र, खासदार जाधव यांनी जमिनीचा मोबदला दिला नाही. तसेच, आम्हाला विश्वासात न घेता व आमचे हक्कसोड प्रमाणपत्र न घेता ही जमीन खरेदी केल्याचा आरोप काळे कुटुंबातील महिलांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर रामप्रसाद काळे यांची पत्नी प्रेमा काळे, दोन मुली सारिका कदम व शीतल आणि सून वर्षा काळे यांनी यासंदर्भात आज परभणीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी शिवसैनिक तथा काळे कुटुंबीयांचे निकटवर्तीय सुहास देशमुख पेडगावकर, व्यंकटेश काळे उपस्थित होते.

खासदार जाधव यांनी आमच्यासह शासनाची फसवणूक केली - सारिका कदम

खासदार जाधव यांनी जमिनीची खरेदी करून घेताना आमच्यासह शासनाची देखील फसवणूक केल्याचा आरोप रामप्रसाद काळे यांची मुलगी सारिका कदम यांनी केला. या जमिनीत कुठलीही झाडे नाहीत, हे शेत कोरडवाहू असल्याचे प्रमाणपत्र घेऊन त्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. तसेच, आम्हाला विश्वासात न घेता व आमचे हक्कसोड प्रमाणपत्र न घेता त्यांनी ही जमीन खरेदी केली. शिवाय कोट्यवधी रुपयांची जमीन त्यांनी काही लाखांमध्ये खरेदी केल्याचा देखील आरोप सारिका कदम यांनी केला.

बाजू खरी असल्याने आमदार दुर्रानींकडून मदत - प्रेमा काळे

दरम्यान रामप्रसाद काळे यांचे पुत्र स्वप्नील काळे हे शिवसैनिक होते. मात्र, गंभीर आजार झाल्याने त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या उपचारासाठी काळे कुटुंबीयांनी यापूर्वी आमदार डॉ. राहुल पाटील यांना 12 एकर जमीन विकल्याचे रामप्रसाद काळे यांच्या पत्नी प्रेमा यांनी सांगितले. मात्र, आमदार पाटील यांनी स्वप्नील काळे हे शिवसैनिक असल्याने आपण सदर जमिनीच्या मोबदल्यात दिलेले पैसे परत केल्यास जमीन वापस देणार असल्याचे म्हटले आहे, असे प्रेमा काळे यांनी सांगितले. तर, अशाच प्रकारची भूमिका सुरुवातीला खासदार संजय जाधव यांनी घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे देखील प्रेमा काळे म्हणाल्या. शिवाय हे प्रकरण खरे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी हे आम्हाला मदत करत आहेत. तर, या प्रकरणी सून आणि दोन नातवांसह आम्ही लवकरच 'मातोश्री'वर उपोषण करणार आहोत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे 'मातोश्री'वर जावून दाद मागणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार जाधवांकडून सत्तेचा दुरूपयोग - वर्षा काळे

माझे पती स्वप्नील काळे यांनी रात्रंदिवस खासदार संजय जाधव यांच्यासाठी काम केले आहे. त्यांचे ते शिवसैनिक होते. मग असे असताना खासदार जाधव यांनी त्यांच्या पश्चात माझ्यावर आणि माझ्या दोन मुलांवर अन्याय का केला ? असा सवाल काळे कुटुंबीयांची सून वर्षा यांनी उपस्थित केला. तसेच, खासदार संजय जाधव स्वतःला वारकरी म्हणून घेतात. मात्र, ते केवळ पब्लिसिटीसाठी वारीला जातात. त्यांनी हे अत्यंत चुकीचे प्रकरण केलेले असून, त्यांच्या हातात असलेल्या सत्तेचा त्यांनी दुरुपयोग केल्याचा आरोप देखील वर्षा काळे यांनी केला.

10 कोटींची जमीन 45 लाखात घेणे, हा व्यवहार कसा काय योग्य होऊ शकतो - सुहास देशमुख

काळे कुटुंबीयांची तब्बल दहा कोटी रुपयांची जमीन खासदार संजय जाधव यांनी केवळ 45 लाख रुपयात घेतली आहे. हा व्यवहार कसा काय योग्य असू शकतो, असा प्रश्न काळे कुटुंबीयांचे निकटवर्तीय तथा शिवसैनिक सुहास देशमुख यांनी उपस्थित केला. तसेच, त्यांनी खासदार जाधव यांनी यापूर्वी केलेल्या व्यवहारावरून त्यांच्यावर टीका केली. खासदारांनी ज्या जागेत कार्यालय थाटले आहे, त्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तर, शहरातील आसाराम बापू यांच्या आश्रमाची जमीन देखील त्यांनी बळकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. तसेच, खासदार संजय जाधव यांचा कुठलाही कारखाना नाही, उद्योग नाही तरी त्यांनी एवढे साम्राज्य कसे उभे केले ? असा सुद्धा सवाल देशमुख यांनी यावेळी केला.

हेही वाचा -परभणी जिल्ह्यातील भाजपनेते अभय चाटे यांचे निधन

तर, खासदार जाधव यांचा जिल्ह्यातील 90 टक्के वादग्रस्त जमिनींमध्ये हात असून त्या जमिनी ते कमी भावामध्ये खरेदी करतात. आणि हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन असल्याची टीकासुद्धा सुहास जाधव यांनी केली. एका शिवसैनिकावर शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधींकडून अन्याय झाल्याने मातोश्रीवर जाऊन दाद मागणार असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.

ज्या व्यक्तीने व्यवहार केला त्याला समोर आणा - खासदार संजय जाधव

माझ्याशी ज्या व्यक्तीने व्यवहार केला त्या व्यक्तीला समोर आणा. त्यानंतर मी कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणात सांगितले आहे. ज्यांच्याशी व्यवहार झाला त्या रामप्रसाद काळे यांना कुटुंबीयांनी कुठेतरी नेऊन ठेवले आहे. आणि आता त्यांचे कुटुंबीय मला ब्लॅकमेल करत असल्याचे देखील यापूर्वीच खासदार जाधव यांनी सांगितले होते. शिवाय या प्रकरणात महसूल मंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले असेल. मात्र, आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी मला न विचारता चौकशीचे पत्र दिल्याचे देखील खासदार संजय जाधव यांनी दोन दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

हेही वाचा -परभणी: 'बर्ड फ्लू'चे थैमान, 5000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरवात

ABOUT THE AUTHOR

...view details