महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत 'एलबीटी'च्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची निर्दोष सुटका - शिवसेना परभणी राडा

शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता झाल्याने आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून या सर्व शिवसैनिकांचा सत्कार केला.

निर्दोष सुटका झालेल्या शिवसैनिकांचा सत्कार करताना आमदार पाटील

By

Published : Aug 28, 2019, 11:33 AM IST

परभणी - शहर महापालिकेकडून वसूल करण्यात येणाऱ्या एलबीटीविरोधात 2017 मध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारून आंदोलन छेडले होते. परंतु व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात येत नसल्याने त्यावेळी शिवसेनेने परभणी महापालिकेत राडा घालत तोडफोड केली होती. दरम्यान, या प्रकरणातून आंदोलनकर्त्या शिवसैनिकांची परभणीच्या जिल्हा न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

परभणी शहर महापालिका झाल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने परभणी शहरातील व्यापाऱ्यांवर एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर लावण्यात आला होता. या कराची वसुली जाचक पद्धतीने होत असल्याची तक्रार व्यापारी करत होते. अनेक व्यापाऱ्यांनी यासाठी बंद पुकारला, उपोषणे केली. तरी देखील सरकारने त्यावेळी एलबीटी करात कुठलीही सवलत दिली नव्हती. असे असले तरी नंतर मात्र सरकारने हा करारच रद्द केला. परंतु एलबीटी आकारण्यात येत असलेल्या वर्षांमधील थकबाकी मात्र अजूनही महापालिकेकडून वसूल करण्यात येत आहे.

या संदर्भात परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी 26 जानेवारी 2017 रोजी बेमुदत बंद पुकारला होता. मात्र, त्यांच्या आंदोलनाची महापालिका दखल घेत नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी महापालिकेत धाव घेतली. त्याठिकाणी बोलण्यासाठी आयुक्त आणि जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेत राडा घालत फर्निचरची तोडफोड केली होती.

या आंदोलनात माजी शहरप्रमुख अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर पवार, संभानाथ काळे, मारोती तिथे, नवनीत पाचपोर, दिलीप गिराम, बबलू नागरे, ,गोविंद पाराटकर, गजानन शहाणे, सुरेश भिसे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. याप्रकरणी महापालिका आयुक्तांच्या तक्रारीवरून शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. हे प्रकरण परभणीच्या न्यायालयात चालले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून बुधवारी सायंकाळी या शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात शिवसैनिकांची बाजू अॅड. आनंद गिराम यांनी मांडली.

हेही वाचा - परभणीत महाजनादेश यात्रेनिमित्त भाजपचे झेंडे लावणारा तरूण विजेचा धक्का लागून गंभीर जखमी

आमदार पाटील यांनी केला सत्कार

दरम्यान, या शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता झाल्याने आमदार डॉ. राहुल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून या सर्व शिवसैनिकांचा सत्कार केला. शिवसेना व्यापार्‍यांच्या पाठिशी अशीच कायम उभी राहणार असून वेळ प्रसंगी आंदोलन करून, असे कितीही गुन्हे अंगावर घेऊ शकते, असे यावेळी आमदार पाटील म्हणाले.

हेही वाचा - परभणीत 2 दिवस मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' यात्रा; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सभांचा धडाका

ABOUT THE AUTHOR

...view details