परभणी - दोन वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजपला टक्कर देऊन सेलू नगरपालिकेत एकतर्फी सत्ता संपादन करणारे जनशक्ती शहर विकास आघाडीचे प्रमुख नगराध्यक्ष विनोद बोराडे आणि त्यांचे 17 नगरसेवक काल भाजपवासी झाले. सेलू येथे जनादेश यात्रेनिमित्त आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान बोराडे आणि त्यांच्या नगरसेवकांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीला धोक्याची घंटा मानली जात आहे. याचा येणाऱ्या विधानसभेवर निश्चित परिणाम जाणवेल.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या भेटीने भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित; कार्यकर्त्यांच्या घेतल्या गाठीभेटी
विनोद बोराडे यांनी 2016 साली झालेल्या निवडणुकीत सेलू पालिकेत एकतर्फी विजय संपादन करून सत्ता प्रस्थापित केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप यांच्या दिग्गज नेत्यांना टक्कर देऊन त्यांनी स्वतःसह 19 नगरसेवक निवडून आणले. त्यानंतर विनोद बोराडे नगराध्यक्ष झाले. त्यावेळेपासूनच बोराडे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्कात होते. भाजप प्रवेशासाठी ते गेल्या अनेक महिन्यांपासून योग्य वेळ आणि संधीची वाट पाहत होते. त्यानुसार काल महा जनादेश यात्रेनिमित्त सेलू येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत त्यांनी उपनगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सुरजितसिंग ठाकूर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना बोर्डीकर, समीर दुधगावकर, अभय चाटे, विठ्ठलराव रबदडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.