परभणी- गेल्या 3-4 दिवसांपासून परभणी शहरातील स्कूल व्हॅन व ऑटोचालक संघटनेने पुकारलेला बेमुदत संप आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आज गुरुवारी संध्याकाळी मिटला. आरटीओ विभागाच्या कडक धोरणाविरुद्ध संघटनेने हा संप तसेच बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, आता कारवाई तूर्तास थांबणार असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा - परभणीतील स्कूल व्हॅनचालकांचा 'आरटीओ' विरोधात बेमुदत बंद
परभणीच्या परिवहन खात्यातील अधिकारी वर्गाने ऑटो चालकांना व शाळा वाहनधारकांना विनाकारण वेठीस धरल्याचा आरोप येथील ऑटो तथा व्हॅन चालक संघटनेने केला आहे. शहरात जागोजागी उभे राहून स्कूल व्हॅन, ऑटोचालकांच्या विरोधात कडक कारवाई करत जप्तीचे आदेश देण्यात आल्याने सर्व ऑटोचालक आणि स्कूलव्हनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे परभणी शहरातील सुमारे साडेतीनशे वाहनधारक आणि ऑटो चालकांनी परिवहन अधिकारी प्रशासनाच्या विरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे पालकांची त्रेधातिरपीट उडाली होती. आज आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेऊन परभणी शहरातील स्कूल व्हॅन संघटना व ऑटोचालक तसेच परिवहन खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी करत हा संप अखेर मिटवला.