परभणी - शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणाऱ्या व्हॅनचालकांनी बंद पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आरटीओकडून होणाऱ्या कारवाया थांबविण्यात याव्यात, तसेच वाहनचालकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी जून महिन्यापर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली.
परभणीत शाळा वाहनचालकांचा बंद हेही वाचा-...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याचे २१ पाईप
दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चात जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांना राणा ऑटो संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रमुख संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वात शहरातील सर्व शाळा ऑटो आणि व्हॅनचालक सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चेकऱ्यांनी ठिय्या मांडून निदर्शने देखील केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आरटीओ यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नी मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार जून महिन्यापर्यंत ऑटो अथवा व्हॅनचालकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेळ देण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ऑटो आणि व्हॅन आज बंद राहिल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली.