परभणी - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या पोकलेन चालकास सरपंचाकडून बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार प्रकार जिंतूर तालुक्यातील कान्हड गावात घडला. गावात काम करायचे असेल, तर टक्केवारी द्यावीच लागेल, अशी पोकलेन चालकास धमकी देत सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार योजनेत 'टक्केवारी'साठी सरपंचांची 'पोकलेन' चालकाला मारहाण
पोकलँड चालकास धमकी देत सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी बोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कान्हड गावातील गायरान जमीनीवर जलयुक्त शिवार अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत दीड लाखाच्या नाली खोलीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. हे काम सेलू येथील सवेरा मजुरी सहकारी संस्थेला सुटले होते. त्यानुसार संस्थेचे चेअरमन अब्दुल अजीज शकूर यांनी पोकलेन मशीनद्वारे कृषी सहाय्यक मधुकर रामराव डोंबे यांच्या समक्ष काम सुरु केले. मात्र, काम सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोकलेन चालक विजय लक्ष्मण सूर्यवंशी यांना तातडीने काम बंद करण्याची मागणी सरपंच मुंजाभाऊ शंकरराव डोंबे, पं. स. सदस्य सचिन ज्ञानोबा डोंबे यांनी केली. त्यांच्या समवेत अन्य ४ लोक होते. विजय सूर्यवंशी यांनी काम चालू द्या, असे सांगताच सरपंच व अन्य लोक भयंकर चिडले. त्यांनी विजय यांना लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
पुन्हा येथे काम केले तर मशीन जाळून टाकू, अशी धमकीही त्यांनी दिली. सरपंच मुंजाभाऊ शंकरराव डोंबे, सचिन ज्ञानोबा डोंबे व अन्य ३ लोकांनी कृषी सहाय्यकासमोर हा मारहाणीचा प्रकार केला. जखमी सूर्यवंशी यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.