परभणी -कोरोनाची लस घेतली नसल्याचे कारण पुढे करून परभणी मनपा प्रशासनाने शेकडो कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांपासून पगार रोखल्याचा अजब प्रकार परभणीत दिसून येत आहे. विशेष म्हणजे या संदर्भात शासनाचे कुठलेही आदेश नसल्याचा दावा कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे याविरोधात आज (मंगळवारी) मनपाच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच 20 सप्टेंबरपर्यंत पगार न झाल्यास 22 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
पैसे असून सुद्धा पगार देत नाहीत -
दरम्यान, मनपा प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे पगार व अन्य मागण्यांबाबतच्या निवेदनावर चर्चा करुन तडजोडीप्रमाणे त्या मागण्या मान्य केल्या होत्या. परंतु त्यापैकी कुठल्याही मागणीची पुर्तता न झाल्यामुळे व प्रशासनाकडे पैसे असून महालक्ष्मीच्या सणांकरीता पगार न दिल्यामुळे संघटनेच्यावतीने मनपा कार्यालयापुढे एकत्र येऊन आज मंगळवारी प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
पगारासाठी लस घेण्याचे बंधनकारक -
मनपा प्रशासनाने लस घेण्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांचे पगार केले नाहीत. हा कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची सुचना न देता पगार न करणे हे योग्य नाही. जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचा पगार तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन व इतर येणी बाकी आहेत. परंतु बाकी रक्कम न देता कर्मचाऱ्यांवर लस घेण्याचे बंधन घातले जात आहे. महाराष्ट्र शासनाने लस घेणे बंधनकारक केलेले नाही. ज्या कर्मचाऱ्याने लस घेलली नाही, अशांचे वेतन देण्यात येऊ नये, असे कुठलेही शासनाचे आदेश नसल्याचे मनपा कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे व सचिव भारसाखळे यांनी सांगितले.
...अन्यथा 22 सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन -
दरम्यान, प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे 20 सप्टेंबरपर्यंत कायम कर्मचारी, रोजंदारी, कंत्राटी तसेच सेवनिवृत्त कर्मचाऱ्यांचा थकीत दोन महिन्याचा पगार व इतर मागण्या मान्य न केल्यास २२ सप्टेंबरपासून मनापातील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा परभणी मनपा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
हेही वाचा - वसईत बाप्पासोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन; वाचा पुढे काय घडलं