परभणी - विविध आजाराने ग्रस्त असलेल्या सेलू येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण झाल्याने काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला. नांदेडमध्ये त्या महिलेवर उपचार सुरू होते, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेच्या संपर्कात आलेल्या सेलू व परभणी येथील 51 लोकांचे नमुने तपासणीसाठी तत्काळ पाठवण्यात आले होते. दिलासादायक बाब म्हणजे त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परभणी जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
'त्या' मृत महिलेच्या संपर्कातील 51 व्यक्तींचे स्वॅब निगेटीव्ह - parbhani news
सेलू येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनाची लागण झाल्याने काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला. नांदेडमध्ये त्या महिलेवर उपचार सुरू होते, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिलेच्या संपर्कात येणाऱ्या सेलू व परभणी येथील 51 लोकांचे नमुने तपासणीसाठी तत्काळ पाठवण्यात आले होते. दिलासादायक बाब म्हणजे त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
त्या महिलेच्या कुटुंबातील 8 आणि त्यांच्या संपर्कातील 19 असे 27 तर परभणीतील ज्या रुग्णालयात महिला उपचारासाठी दाखल झाली होती तेथील 24 अशा एकूण 51 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने या सर्वांना क्वॉरंटाईन केलेले आहे. त्यांच्या स्वॅबचे अहवाल शुक्रवारी दुपारी आले आहेत. तर नांदेड येथे महिलेसोबत असणार्या दोघा नातेवाईकांचे अहवाल नांदेडच्या आरोग्य प्रशासनाने तत्काळ तपासले असता, ते यापूर्वी निगेटिव्ह निघाले आहेत.
दरम्यान, नांदेडच्या रूग्णालयात उपचारादरम्यान सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर जिल्हा महसूल, पोलीस व आरोग्य यंत्रणा कमालीच्या खडबडून जाग्या झाल्या होत्या. पाठोपाठ सेलू नगरपालिका व परभणी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामास लागली होती. सेलूत यंत्रणांनी संयुुक्तपणे सर्वप्रथम कुटुंबायातील सदस्यांना क्वारंटाईन केले. तेथील रुग्णालयात रवाना केले. पाठोपाठ त्यांचे स्वॅब घेतले. राजमोहल्ला नावाचा परिसर सीलबंद करून सर्व्हेक्षण सुरू केले. तर परभणीत ती महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये 2 तास थांबल्याची माहिती कळाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी मध्यरात्री ते हॉस्पिटलच सील केले. लगेच फवारणी करीत मोंढा परिसर निर्जंतुक करण्यात आला.
ही महिला 4 महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये एका रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाटी दाखल झाली होती. 27 एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता एका खासगी वाहनाद्वारे त्या महिलेस कुटुंबीयांनी सेलू येथे आणले. परंतू, 28 एप्रिल रोजी महिलेस अस्वस्थ वाटल्याने कुटुंबीयांनी सेलूतून परभणीत आणल्यानंतर मोंढा भागातील एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. तेथून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले. त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकार्यांनी स्वॅब घेतले. तेव्हा ती महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सेलूत दोन दिवसांची आणि त्यानंतर आज त्यात एक दिवसाची वाढ करत एकूण 3 दिवस संचारबंदी लावली आहे.