परभणी- पालिकेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून 'माझे काम का केले नाहीस, असे म्हणत आमदार विजय भांबळे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी आमदार भांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तराव विश्वनाथ तळेकर असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
आमदार विजय भांबळेंसह दत्तराव तळेकर
दत्तराव विश्वनाथ तळेकर हे जिंतूर पालिकेतील कर वसुली अधिकारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत 'आमदार भांबळे यांनी त्यांना घरी बोलावून घेतले होते. यावेळी सांगितलेले काम तू का केले नाहीस, असे म्हणत ते काम करण्यासाठी दबाव आणला. परंतु या दबावाला नकार दिल्यानंतर आमदार भांबळे यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आमदार भांबळे यांनी या पूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी केलेल्या शिविगाळीच्या क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातच पुन्हा या घटनेचे जिल्ह्यातील अधिकारी वर्गात पडसाद उमटले आहेत. पोलीस ठाण्यात तळेकर यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा नोंदविण्यात येत असल्याने अधिकारी-कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. तसेच राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण घडल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणत लक्ष घातले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे जिंतुर येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची तारांबळ उडत आहे. दरम्यान, त्या अधिकाऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रारदेखील जिंतूर पोलिसांकडे करण्यात आली आहे.