परभणी- जिल्ह्यातील जिंतूर आणि पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी करत भाजपच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिवसेनेच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर येथील राम पाटील खराबे तर पाथरीचे डॉ. संजय कच्छवे यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात चार विधानसभा असून यामध्ये शिवसेना-भाजपच्या वाटाघाटीत परभणी व गंगाखेड हे दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. तर जिंतूर आणि पाथरी हे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी जिंतूर आणि पाथरी हे दोन्ही मतदारसंघ युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेकडे असायचे. परंतु यावेळी भाजपने कुरघोडी करत गंगाखेड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला देवून या दोन्ही मतदारसंघावर दावा केला. त्यानुसार भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी जिंतूरातून तर पाथरी येथे विद्यमान आमदार मोहन फड यांनी भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
हेही वाचा - 'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील'
परंतु युती धर्म पाळण्याचे आवाहन दोन्ही पक्षांकडून होत असले तरी, आपण दावेदार असल्याचे सांगत जिंतूर येथे राम पाटील खराबे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते असलेले राम खराबे हे 2014 च्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार होते. शिवाय सध्या त्यांच्याकडे शिवसेनेतील विधानसभा प्रमुख म्हणून पद आहे. त्यानुसार त्यांनी गेल्या काही वर्षांपासून जिंतूर विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी केली आहे. परंतु ऐनवेळी खेळ बिघडला, आणि त्यांना उमेदवारी मिळाली नाही; परंतु जनतेत आपला प्रभाव असून आपण इतके दिवस जनतेची केलेली कामे या निवडणुकीत आपल्याला जिंकून देईल, असा विश्वास पाटील यांनी आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात ठाण मांडले आहे. परंतू याचा फटका भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांना बसण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांना फायदा होणार असून, मेघना बोर्डीकर यांचा विजय धोक्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार अन् बरंच काही...भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध
तसेच दुसरीकडे पाथरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा विधानसभाप्रमुख डॉ. संजय कच्छवे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचा काही प्रमाणात फटका विद्यमान आमदार मोहन फड या भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेने युती धर्म पाळण्याचे आवाहन त्यांना केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आज शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून ही हकालपट्टी जाहीर केली आहे.