परभणी- परभणी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. या दिवशी आघाडी आणि युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल होणार आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यासोबत शरद पवार, छत्रपती उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर सेना-भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या सोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे कोणाचे शक्ती प्रदर्शन भारी ठरते, याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रॅली काढून अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी ३ वाजता स्टेडियम मैदानावर सभा होणार आहे. या सभेला ६० ते ७० हजार लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा दुराणी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राजेश विटेकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. तर आघाडीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितवरून दोन्ही काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी अद्याप होकार दिलेला नाही. तसेच काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख हे जोरात काम करत असल्याचे सांगितले. मात्र, ते आघाडींच्या बैठकांमध्ये अनुपस्थित राहतात. या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार गणेशराव दुधगावकर हे देखील प्रचारापासून अलिप्त राहत आहेत. या परिस्थितीत आघाडीचे शक्ती प्रदर्शन कसे होते, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे.