महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 20, 2020, 3:54 PM IST

ETV Bharat / state

मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता.. तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यता

मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहणार आहे. सोबतच उद्या २१ व परवा २२ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील परभणीसह बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.

rain in Marathwada for next two days
मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

परभणी - मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहणार आहे. सोबतच उद्या २१ व परवा २२ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील परभणीसह बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दिवाळीपूर्वी वाढलेली थंडी पुन्हा एकदा जोर धरण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार मराठवाड्यात २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत तापमानात सरासरीपेक्षा घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

यावर्षी दिवाळीपूर्वीच मराठवाड्यात थंडीने जोर पकडला होता. मात्र ऐन दिवाळीत पुन्हा तापमान वाढत जाऊन किमान तापमान 20 अंशावर जाऊन पोचले आहे. मात्र, आता पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी वर्तवली आहे.

8 अंशावर आले होते तापमान -

दरम्यान, हिवाळ्यात परभणी शहराच्या तापमानाचा पारा 2 अंशापर्यंत खाली उतरल्याचे 2018 मध्ये सर्वानीच अनुभवले आहे. त्याचप्रमाणे यंदा जिल्ह्यात पाऊस जोरदार झाला. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याची पाणी पातळी देखील वाढली आहे. यामुळे जिल्हयात यंदा थंडी वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 11 नोव्हेंबरला 8 अंश सेल्सिअसवर आला होता. तर यापूर्वी परभणीच्या इतिहासात 29 डिसेंबर 2018 रोजी 2 अंश तर 17 जानेवारी 2003 ला 2.8 आणि 18 डिसेंबर 2014 रोजी 3.6 अंश एवढया निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षी देखील असेच काहीसे वातावरण असेल, ज्याचा परिणाम पुन्हा एकदा परभणीचे तापमान निचांकी पातळीवर जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला -

येणाऱ्या काळात हवामानात होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून, तूर पिकात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे याच्या व्यवस्थापनासाठी क़्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४.४ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

ज्वारीचे असे करा व्यवस्थापन -

पेरणी केलेल्या रब्बी ज्वारीला एक महिना पूर्ण झाला असल्यास ४० किलो नत्र खताची मात्रा देऊन पाणी व्यवस्थापन करावे. उगवण झालेल्या रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम १२.६ टक्के अधिक ल्यामडा सायहालोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर गहू पिकात पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.

केळी, द्राक्ष बागांचे असे करा व्यवस्थापन -

सध्या केळीचे पिक वाढीच्या अवस्थेत असून केळी बागेत सिगाटोगा रोग दिसून येत असल्याने त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मिली अधिक स्टिकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत तणाचे नियंत्रण करावे. केळी बागेत झाडांना मातीचा आधार देऊन पाणी व्यवस्थापन करावे. तर द्राक्षे पिक फुले लागण्याच्या अवस्थेत असून आवश्यकतेनुसार द्राक्षे बागेत पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्षे बागेत जीए३ @ १० मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अन्य पिकांसाठी व्यवस्थापन -

या शिवाय पुनर्लागवड केलेले भाजीपाला व फुल पिक वाढीच्या अवस्थेत असून पिकात तण व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करावे. तर तुती रेशीम ची ७० दिवसाच्या अंतराने वर्षाकाठी ५ वेळा तुती छाटणी करावी. प्रत्येक ४५ दिवसाच्या अंतराने फांद्या छाटणी करावी व खाद्य द्यावे. पट्टा पध्दत लागवडीत (५ X ३ X २ फुट) काळे मेन कापड आच्छादन, द्रवरूप खत ठिबकच्या सहाय्याने व पाणी देणे सोईचे होते. ८ टन प्रती एकर प्रमाणे ४ टन जून व ४ टन नोव्हेंबर महिन्यात कुजलेले शेणखत द्यावे, असेही कृषी विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details