परभणी -जिल्ह्यातील गंगाखेड शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या संयुक्त धाडीत 7 लाख 73 हजार 482 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तर या प्रकरणात तीन गुटखा माफियांना अटक करण्यात आली आहे.
परभणी : गंगाखेडमध्ये गुटखा माफियांवर छापेमारी; आठ लाखाचा गुटखा जप्त - परभणी गुटखा माफिया बातमी
गुटखा बंदी असतानाही त्याचा साठा करून अनेक गुटखा माफियांकडून हा व्यवसाय सर्रासपणे सुरू होता. त्यामुळे पोलीसांनी गंगाखेड शहरामध्ये धाडी टाकून लाखोंचा गुटखा जप्त केला.
गंगाखेड शहरामध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शासनाची गुटखाबंदी असतानाही त्याचा साठा करून अनेक गुटखा माफियांकडून हा व्यवसाय सर्रासपणे सुरू होता. त्यामुळे पोलीस अधिक्षक जयंत मिना, अप्पर पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या आदेशावरुन उपविभागीय अधिकारी बलराज लांजिले व परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या संयुक्त पथकाने रविवारी गंगाखेड शहरातील जैदीपुरा, गुलजार काॅलनी येथे धाडी टाकल्या. तेंव्हा तेथे गुटख्याचा मोठा साठा त्यांच्या हाती लागला. यावेळी 7 लाख 73 हजार 482 रुपयांचा साठा जप्त करुन तीन आरोपींना अटक केली. मात्र, तेथून 2 आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अटक केलेल्या तिघांना रविवारी न्यायालयासमोर हज़र केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.