परभणी- एमआयडीसी परिसरात नॅनो नावाने चालणाऱ्या अग्रवाल इंडस्ट्रीजवर बुधवारी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या ठिकाणी नॅनो व रिट या नावाने विना परवानगी पॅकेजिंग करून पाणी विकले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पॅकेजिंग बाटल्या, पाण्याचे जार व पाण्याचे पाऊच तसेच थंड पाणी मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे. पण ते पाणी खरच शुद्ध केले आहे का? त्या उद्योगाने अन्न व औषध विभागाचा परवाना घेतला आहे का ? याची खातरजमा कोणी करत नाही. याचाच फायदा घेऊन विनापरवाना बाटलीबंद पाणी विकून लाखो रुपयाचा शासनाचा महसूल बुडवला जात आहे. हाच प्रकार परभणीच्या अन्न व औषधी विभागाने केलेल्या या कारवाईत उघड झाला आहे.
हेही वाचा - 8 दिवसांपासून गाव अंधारात; त्यात रोहित्रही जळाले
परभणी जिल्ह्यामध्ये 10 ते 12 पॅकेजिंग पाणी विकणाऱ्या कंपन्या आहेत. बऱ्याच कंपन्यांकडे अन्न विभागाचा परवाना नसल्याचे तर काहींचे परवाने कालावधी संपल्याचे अन्न विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी परिसरातील अग्रवाल इंडस्ट्रीजवर छापा टाकण्यात आला. अग्रवाल इंडस्ट्रीज ही नॅनो व रिट या नावाने बाटलीबंद पाणी विक्री करते. मात्र, नॅनोचा अन्न परवाना ऑगस्ट महिन्यामध्ये संपला होता. त्यांनी त्याचे अद्यापही नूतनीकरण केले नाही. विनापरवाना पाणी विकत होते.
हेही वाचा - नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या मुलींना परभणीत अनोखी भेट; वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
अधिकाऱ्यांना आस्थापनाच्या तपासणीत अन्नपदार्थावर अन्न परवान्याचा उल्लेख नसल्याचे देखील आढळून आले. त्यामुळे अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर उर्वरित 4 लाख 85 हजार 466 रुपये किमतीचा साठा जप्त करून अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच कंपनीचे काम तत्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे व अरुण तमडवार यांनी केली.