परभणी -जिल्ह्यात वाढणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारपासून पुढील पाच दिवस 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते, मात्र व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी हे आवाहन धुडकावले आहे. बाजारपेठ बंद करण्याऐवजी प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी बाजारात सोशल-डिस्टन्सचे पालन होते की नाही, तोंडाला मास्क बांधला जातो का, या बाबींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला परभणीच्या जिल्हा व्यापारी महासंघाने दिला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 5 हजाराच्या पुढे गेली आहे. शिवाय, तब्बल 215 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीचा दीड महिना एकही रुग्ण नसणाऱ्या परभणीत ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत गेला. त्यामुळे 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा, सेवा, शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद ठेवून व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी पुढे येऊन या जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. अर्थात, या जनता कर्फ्यूतून त्यांनी आरोग्य तथा इतर अत्यावश्यक सेवेला सूट दिली होती, मात्र जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन धुडकावून लावत लहान टपऱ्यांपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सर्वच दुकाने सुरू ठेवली आहेत. बाजारात नागरिकांची वर्दळ देखील पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. विशेष म्हणजे, गांधी पार्क, शिवाजी चौक, क्रांती चौक, सुभाष रोड, स्टेशन रोड या मुख्य बाजारपेठेत कमालीची गर्दी दिसत आहे.
पाच दिवसांत संसर्ग कमी होणार का - सचिन अंबिलवादे