महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 6, 2021, 7:44 PM IST

ETV Bharat / state

परभणीत आंदोलन, निदर्शनांना बंदी.. धार्मिक स्थळेही १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

परभणी जिल्ह्यातील वाढत्या 'कोरोना'वर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. 15 मार्चपर्यंत विदर्भातील 11 जिल्ह्यासाठी प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध तर जिल्ह्यातील निदर्शने, रास्तारोकोला बंदी आणण्यात आली असून, धार्मिक स्थळे देखील 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

religious places closed till March 15 in Parbhani
religious places closed till March 15 in Parbhani

परभणी -जिल्ह्यातील वाढत्या 'कोरोना'वर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापनेतील अधिकारी-कर्मचारी व मालक, कामगार, व्यापारी, फळ व भाजीपाला आणि दुध विक्रेते, चिकन, मटण, अंडी विक्रेते, रिक्षा, टॅक्सी चालकांना 16 मार्चपर्यंत आरटीपीसीआर व अँटीजेन तपासणी करुन घेण्याबाबचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत. शिवाय 15 मार्चपर्यंत विदर्भातील 11 जिल्ह्यासाठी प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध तर जिल्ह्यातील निदर्शने, रास्ता रोकोला बंदी आणण्यात आली असून, धार्मिक स्थळे देखील 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.


जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील शासकीय, खासगी आस्थापनेतील अधिकारी- कर्मचारी व मालक, कामगार, व्यापारी, फळ विक्रते, भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते, चिकन, मटन, अंडी विक्रेते, रिक्षा, टॅक्सी चालक इत्यादीकडे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग, प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असल्याने शासकीय, खाजगी आस्थापनेतील अधिकारी- कर्मचारी व मालक, कामगारांची आरटीपीसीआर, अॅन्टीजेन तपासणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे चाचणी करून घ्यावी. आदेशाचे उल्लंघन करुन आस्थापना उघडल्यास त्यांच्यावर महानगरपालिका आयुक्त, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच व्यापारी आस्थापनेशी संबंधित कार्यालयांनी कार्यवाही करावी. हे आदेश प्रत्येक ईसमावर तामील करणे शक्य नसल्याने हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

हे ही वाचा - मालेगावच्या माजी आमदारावर गुन्हा; नियमांना तिलांजली देत घेतली होती जाहीर सभा

धार्मिक स्थळे 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी -

सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना संसर्गात होणारी वाढ पाहता सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व धार्मीक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता धार्मीक स्थळे 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता या कालावधीत वाढ करुन जिल्हयातील धार्मीक स्थळे 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच धार्मीक स्थळामध्ये दैनंदिन विधी पार पाडण्यासाठी 5 व्यक्तींना परवानगी असणार आहे, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

विदर्भातील 'या' 11 जिल्ह्यासाठी प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध -

साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकारातून विदर्भातील नागपूर, चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, भंडारा, गोंदीया, वर्धा या जिल्हयातून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या व परभणी जिल्ह्यातून विदर्भातील या 11 जिल्ह्यात जाणाऱ्या खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस 15 मार्चपर्यंत प्रतिबंध कायम ठेवण्यात आला आहे, असे देखील आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे ही वाचा - छापेमारीवर तापसी...'नॉट सो सस्ती एनीमोर', कंगनाचे धडाकेबाज प्रत्युत्तर

जिल्ह्यात निदर्शने, रास्तारोकोला बंदी -

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांकडून आयोजित करण्यात येणारे मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, उपोषण व सर्व प्रकारची आंदोलने इत्यादीवर 15 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली असल्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग नियंत्रण प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नूसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details