परभणी- शहरातील जायकवाडी परिसरात शिवसेना नगरसेवकाचा त्याच्याच मित्राने खून केल्याची घटना घडली आहे. नळाच्या पाण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. मात्र, या घटनेला त्यांच्यातील आर्थिक देवाणघेवण असल्याचे बोलले जात आहे. खून केल्यानंतर मारेकरी स्वतःहुन ठाण्यात हजर झाले आणि त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
परभणीत शिवसेना नगरसेवकाची हत्या
अमरदीप रोडे असे मृत शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे. आज रविवारी सकाळी जायकवाडी परिसरात नळाच्या पाण्यावर काही वाद झाला होता. त्यावेळी नागरिकांनी नगरसेवक रोडे यांना तेथे बोलावले होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही वाद झाला. या वादात अमरदीप यांचे मित्र किरण सोपानराव डाके (रा. मातोश्री नगर) आणि रवी वसंतराव गायकवाड (रा. जायकवाडी) यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून हा प्रकार घडला.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वादावादीत अमरदीप रोडे यांनी या दोघांवर कुऱ्हाडीचा वार केला. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी दोघांनी अमरदीपला ढकलून दिले. ते खाली पडल्यानंतर त्या दोघांनी अमरदीप यांच्या डोक्यात मोठा दगड घातला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर किरण डाके आणि रवि गायकवाड हे नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, या घटनेमागे अमरदीप रोडे आणि त्यांच्या मित्रांमध्ये यापूर्वी झालेल्या आर्थिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
शहरात तणावाची स्थिती -
या घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला होता. नवा मोंढा पोलीस ठाण्यात देखील मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पोलिसांना पांगवावी लागली. रोडे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी देखील त्यांचे नातेवाईक आणि मित्रांचा मोठा जमाव जमला आहे. घटनेला अनुचित वळण लागू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाने मोठा बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात राखीव पोलीस दलाच्या तुकड्या आणि स्थानिक पोलिस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत.