परभणी -जिल्ह्यातील 566 पैकी 68 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने उद्या (शुक्रवारी) उर्वरीत 498 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, 1 हजार 573 मतदान केंद्रांवर तब्बल 7 हजार 865 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय 6 पोलीस उपाधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक यांच्यासह सुमारे दीड हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी 1 हजार 573 मतदान केंद्र सज्ज -
जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीसाठी उद्या (शुक्रवारी) सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी विविध पथके आपापल्या मतदान केंद्रावर आज (गुरुवारी) संध्याकाळपर्यंत रवाना झाले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 हजार 573 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रावर मतदानाच्या साहित्यासह अधिकारी-कर्मचारी रवाना झाले आहे.
परभणीच्या कल्याण मंडपम येथून साहित्याचे वितरण -
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील तहसीलदारांच्या नेतृत्त्वात तालुक्याच्या ठिकाणी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन साहित्यासह रवाना करण्यात आले आहे. त्यानुसार परभणी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 257 मतदान केंद्रांवर पथके रवाना करण्यात आली आहेत. यासाठी परभणी शहरातील कल्याण मंडपम येथून निवडणुकीच्या साहित्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती परभणीचे तहसीलदार संजय बिराजदार यांनी दिली आहे. या मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, व बंदोबस्तासाठी एका पोलिसांचा समावेश आहे.