परभणी - परभणी पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावर थेट बडतर्फीची तर अन्य 2 कर्मचाऱ्यांवर वेतनवाढ स्थगित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी ही कारवाई केली. 'शासकीय सेवेत असताना डंपर विकत घेऊन त्याचा अवैधरित्या वाळू वाहतुकीसाठी वापर केल्याचा आरोप सोनपेठ मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला होता. तसेच अन्य दोघांनी अवैध वाळूचा ट्रक का पकडला? म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घातला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
सुमारे दोन आठवड्यांपूर्वीच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी यापूर्वीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचीच कार्यप्रणाली स्वीकारली आहे. उपाध्याय यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक दोषी कर्मचाऱ्यांवर सेवेतून थेट बडतर्फ आणि निलंबन करण्याच्या कारवाया केल्या आहेत. यामुळे पोलीस दलाला चांगली शिस्त लागली होती. आता पुन्हा एकदा बेशिस्त आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे.
हेही वाचा-अभिनेत्री कंगना रणौतचे आणखी अनधिकृत बांधकाम; दिंडोशी न्यायालयात आज सुनावणी
पोलीस शिपाई सुग्रीव कांदे बडतर्फ
दरम्यान, बडतर्फ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सुग्रीव धोंडीबा कांदे असे असून, त्यांची नेमणूक सोनपेठ पोलीस ठाणे येथे होती. कांदे यांनी पोलीस अधीक्षकांची पूर्व परवानगी न घेता डंपर वाहन खरेदी करून गौण खनिज वाहतुकीसाठी त्याचा वापर केला. या संदर्भात विभागीय चौकशी करण्यात आली. त्या चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी पोलीस शिपाई सुग्रीव कांदे यांना शासकीय सेवेतून थेट बडतर्फ केले. तर यापूर्वी निलंबित केलेले पोलीस नाईक भीमराव हरी पवार व निलंबित चालक पोलीस शिपाई भगीरथ रघुनाथ जाधव यांच्यावर वेतनवाढ स्थगितीची कारवाई करण्यात आली आहे.
आगामी वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी स्थगित
पाथरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांनी अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रक जप्त करून गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस नाईक भीमराव हरी पवार व निलंबित चालक पोलीस शिपाई भगीरथ रघुनाथ जाधव यांनी हा ट्रक पोलीस ठाण्यात का आणला? असे म्हणत सहाय्यक पोलीस निरीक्षक तिप्पलवाड यांच्याशी एकेरी भाषा वापरून वाद घातला होता. या संदर्भात विभागीय चौकशी करण्यात आली. त्या चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक मीना यांना प्राप्त झाला. त्यानुसार पोलीस अधीक्षक मीना यांनी या दोन्ही पोलिस कर्मचार्यांच्या आगामी वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी स्थगित करण्याबाबत आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा-त्यासाठी तुम्ही शरद पवारांना भेटा; राज यांना कोश्यांरीचा 'मनसे' सल्ला