परभणी -केवळ 3 महिन्यांपूर्वीच परभणीत सुरू झालेले पोलीस अधीक्षक जयंत मीना हे अवैद्य धंदे चालकांसोबतच गुंडांसाठी देखील कर्दनकाळ ठरले आहेत. विशेष म्हणजे पोलीस खात्यांतर्गत चालणारा भ्रष्ट कारभार आणि गैरवर्तन संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी दोषी पोलिसांवरदेखील मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. या प्रमाणेच आज (मंगळवारी) पोलीस अधीक्षक मीना यांनी शहरातील 7 टोळी गुंडा हद्दपार केले. तर 13 गुंडांची पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याचे आदेश बजावल्याने अन्य गुंडांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
'हे' गुंड झाले हद्दपार -
हद्दपारी संदर्भात पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी आदेश काढले आहेत. ज्यामध्ये टोळी सदस्य अनिल नागोराव झाटे, गजानन बाळासाहेब चव्हाण, गौरव सुरेशराव देशमुख, देवानंद विठ्ठल चव्हाण, हनुमान जानकीराम रायमले, सचिन अनिलराव पवार व देशमुख यांना परभणी जिल्ह्याच्या हद्दीतून 9 महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
'यांची' लागणार नियमित हजेरी -
तसेच मोहंमद इक्रामोद्दीन आसेफोद्दीन, शैलेश रमेश चव्हाण, महेश रुस्तूमराव खलाळ, राहूल पंढरीनाथ घोडके, वैभव विश्वनाथ झोडपे, विजय गंगाराम खुने, महेश संभाजीराव साखरे, संतोष भरतराव झाडे, कन्हैय्या उर्फ राजू उर्फ राजेंद्र रामराव पवार, मंगेश मुरली दिपके, नारायण हरिभाऊ खाडे, गौतम उर्फ बाबा पुरभाजी वायवळ, सुरेश दिपक शेळके या टोळी सदस्यांना पुढील 9 महिने नानलपेठ पोलीस ठाणे येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी व्यक्तीशः हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी 10 हजार रुपयांचे बंद पत्र, चांगल्या वर्तवणुकीचे हमीपत्र सक्षम साक्षीदारासह हजर करण्याचे देखील आदेशीत करण्यात आले आहे.
या गुंडांवर हे गुन्हे आहेत दाखल -
दरम्यान, परभणी जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या सात जणांना नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी हद्दपार क्षेत्राच्या बाहेर नेऊन सोडले. हद्दपार करण्यात आलेल्या लोकांविरुध्द सर्वसामान्य नागरीकांच्या जीवितास, मालमत्तेस धोका निर्माण करणे, जबरी गुन्हे, चोरी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा, दंगा करणे अशा प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
हेही वाचा - पुढील आठवड्यात होऊ शकते कोरोना लसीकरणाला सुरुवात; आरोग्य सचिवांचे संकेत