परभणी- शहरात ईदच्या तोंडावर विक्रीसाठी आणलेल्या तब्बल 840 चाळीस किलो बनावट खव्याच्या साठ्यावर गुन्हे शाखेने छापा मारला. या प्रकरणी पोलिसांनी गिरीश माटरा, सय्यद असलम हसन, सय्यद चाँद शेख, करण शिंदे, सय्यद अहेमद हसन या आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील नानलपेठ भागात राहणाऱ्या गिरीश माटरा हा साई प्रोडक्ट्स, वलाद (गांधीनगर) या कंपनीच्या नावाने जामखेड (जि.नगर) येथे हा बनावट खवा तथा दुग्धजन्य पदार्थ काही साथीदारांच्या मदतीने तयार करत होता. त्याने ईदच्या पार्श्वभूमीवर हा खवा परभणी, बीड व हिंगोली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला होता. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याचा हा डाव हाणून पाडला.
या कारवाईत एक पीकअप व्हॅन, उत्पादीत 28 गोण्यांतील 84 सीलबंद खव्याची पाकीटे ( वजन 840 किलो ) एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, या प्रकरणात गिरीश माटरा, सय्यद असलम हसन, सय्यद चाँद शेख, करण शिंदे, सय्यद अहेमद हसन या चौघांना पथकाने अटक केली आहे. हे आरोपींनी सय्यद असलम हसन (रा.जामखेड) यांच्या घरी बेकायदेशीर खवा तयार करत होते. तो खवा साई प्रोडक्टस् वलाद (गांधीनगर) या कंपनीच्या नावाची पाकीटे गुजरातमधून मागून हा खवा आयएसओ प्रमाणित असल्याचे दाखवत होता. मागील सहा महिन्यांपासून मिठाई तयार करणाऱ्या खवा उत्पादकांना हा खवा पुरवठा करण्याचा सपाटा त्याने लावला होता.
त्याच्याकडे खवा अथवा दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा कोणत्याही प्रकारचा परवाना, शैक्षणीक व तांत्रीक गुणवत्ता, कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. असे असतानाही त्याच्याकडून होणाऱ्या या व्यवसायामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. येणाऱ्या काळात देखील त्यांचा हा खवा धोकादायक ठरणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, किशोर नाईक, हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, भगवान भुसारे, हरिश्चंद्र खुपसे, अरूण पांचाळ व राजेश आगाशे यांनी केली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.