परभणी -सध्या 'कोरोना'च्या दहशतीने संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. शिवाय महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून, या परिस्थितीत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. अनेक धर्मगुरूदेखील या संदर्भात आवाहन करताना दिसतात. असे असतानाही परभणी शहरात एका मशिदीत आज काही लोकांनी एकत्र जमून नमाज अदा केली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात मशिदीच्या अध्यक्ष, इमामासह इतर काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला.
संचारबंदीचे उल्लंघन; परभणीत नमाजसाठी एकत्र आलेल्या लोकांवर गुन्हे दाखल
संचारबंदी लागू असतानासुद्धा शक्रवारी दुपारी एका मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी लोक एकत्र आले असल्याने परभणी पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी मशिदीचे अध्यक्ष, इमाम यांच्यासह 17 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'कोरोना' विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून संचारबंदीअंतर्गत देशातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यात होणाऱ्या प्रार्थना बंद करण्यात आल्या आहेत. यामागे लोकांनी एकत्र येऊ नये, हा उद्देश आहे. मात्र, वारंवार सांगूनदेखील परभणीत या नियमाला हरताळ फासला जात असल्याने पोलीसही वैतागले आहेत. शुक्रवारी असाच एक प्रकार परभणीच्या शाही मशिदीमध्ये दिसून आला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भात आदेश बजावूनदेखील शाही मशिदीमध्ये दुपारची नमाज अदा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी यासंदर्भात पूर्ण पुरावे गोळा करून संध्याकाळी नानलपेठ पोलीस ठाण्यात कलम 51 तसेच साथरोग आणि आपत्ती व्यवस्थापन या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये मशिदीचे अध्यक्ष व इमाम आणि इतर 17 लोकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.