परभणी- इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक दर परभणीत असून, या उच्चांकी दरामुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. परभणीत पॉवर पेट्रोल तब्बल 111.70 रुपये तर साधे पेट्रोल 108.19 पैसे प्रति लिटर एवढ्या दराने विक्री होत आहे. तसेच डिझेलसुद्धा (97.62 रुपये) शंभरीच्या अगदी जवळ पोहचले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात पेट्रोल 27.28 तर डिझेल 28.9 रुपयांनी महागले आहे. ज्याचा परिणाम परभणी जिल्ह्यातील महागाईवर झाल्याचे दिसून येत आहे.
'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' या म्हणीप्रमाणे परभणी इंधनाच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे नेहमी प्रमाणे चर्चेत असते. परभणीत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीची घोडदौड कायम आहे. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल सध्या परभणीकारांना घ्यावे लागत आहे. परभणी शहरात सोमवारी (दि. 5 जुलै) पावर पेट्रोल तब्बल 111 रुपये 70 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर साधे पेट्रोल 108.19 पैसे दराने विकल्या जात आहे. तसेच डिझेलच्या दराचाही भडका उडाला असून, डिझेल 97.62 पैसे प्रतिलिटर प्रमाणे परभणीकर खरेदी करत असल्याने तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
वर्षभरात पेट्रोल 27.28 रुपयांनी महागले
विशेष म्हणजे गतवर्षी जून महिन्यातच परभणीत पेट्रोलचे दर 80 रुपये 96 पैसे प्रति लिटर एवढे होते, तर डिसेंबरमध्ये अर्थात सहा महिन्यांपूर्वी 92.4 रुपये आणि तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यात 96 रुपये 66 पैसे आणि मे महिन्यात 99 रुपये 74 पैसे प्रति लिटर दराने विक्री झाले आहे. त्यानंतर जून महिन्यात हा दर शंभरीच्या वर गेला. तसेच रविवारी (4 जुलै) 107.86 पैसे प्रति लिटर झाला, तर सोमवारी (दि. 5 जुलै) त्यात 33 पैशांची वाढ झाली असून, 108 रुपये 19 पैसे प्रति लिटर दराने पेट्रोल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे.
डिझेलमध्ये 28.9 रुपयांची वाढ
पेट्रोलप्रमाणे डिझेलही आता शंभरीच्या वाटेवर आहे. डिझेलमध्येही गेल्या वर्षभरात तब्बल 28.9 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात परभणीत डिझेल 69 रुपये 58 पैसे तर सहा महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात 81 रुपये 29 पैसे एवढ्या दराने विक्री झाले. शिवाय तीन महिन्यापूर्वी मार्च महिन्यात 89.26 तर मे महिन्यात 89 रुपये 45 पैसे एवढा झाला. यात पुन्हा वाढ होऊन रविवारी (दि. 4 जुलै) 97.62 पैसे एवढ्या दराने डिझेलची विक्री झाली. मात्र, आज (सोमवारी) त्यात वाढ झाली नसून 97.62 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे.