परभणी- संपूर्ण देशात इंधनाचा सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती उतरल्याने केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तेलाच्या किमती उतरल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास ४ रुपयांनी उतरले आहेत. याबद्दल परभणीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
'कोरोना' चा फटका जागतिक स्तरावर इंधन व्यवसायाला देखील बसला आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर गेल्या काही दिवसात उतरले आहेत. त्यामुळे, मागच्या फेब्रुवारी महिन्यात ८३ रुपये ३० पैसे इतका दर असलेले पेट्रोल आता ७८.३२ रुपयांना उपलब्ध झाले आहे. त्याप्रमाणेच डिझेल देखील ४ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा दर आता ६७.६५ पैसे इतका झाला आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात एक ते दीड रुपयांनी पेट्रोल महाग मिळते, कारण शहराच्या जवळ पेट्रोल डिझेलचा कुठलाही डेपो नाही. जिल्ह्याला मनमाड किंवा सोलापूर या ठिकाणांहून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. हे अंतर मोठे असल्याने वाहतुकीचा खर्च वाढतो, आणि त्याचा परिणाम परभणीकरांना सर्वाधिक दर देऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागते.