परभणी- जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 8 दिवसांच्या कडक टाळेबंदीला सुरुवात केली आहे. मात्र, याला व्यापारी आणि विविध संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला असून, याविरोधात आज (दि. 24 मार्च) आंदोलने देखील केली. पण, जिल्हाधिकारी मुगळीकर सध्यातरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र, 'लॉकडाऊनच्या सुरुवातीचे तीन दिवस काय परिस्थिती होते ते पाहू, त्यानंतर कोणत्या बाबींना सवलती द्यायची, याबाबत निर्णय घेऊ', अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे व्यापारी महासंघाने मात्र, 'लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद ठेवायची का उघडायची, याचा निर्णय प्रत्येक व्यापाऱ्याने स्वतः घ्यावा', अशी भूमिका घेतल्याने प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
टाळेबंदी विरोधात व्यापारी आक्रमक; विविध संघटनांचे आंदोलन
परभणीच्या जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांसह उद्योजक, कामगार, मंडप डेकोरेशन व्यावसायिक आणि कलाकारांसह विविध संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी व्यापाऱ्यांनी आज (बुधवारी) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्रमक भूमिका घेतली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कामगार संघटना, मंडप डेकोरेशन व्यवसायिक आणि कलाकारांनी काळा दिवस पाळून घोषणाबाजी करत प्रशासनाविरुद्ध निदर्शने केली. एकूणच या टाळेबंदीला व्यापारी, विविध संघटना तसेच लहान मोठ्या पक्षांनी देखील विरोध दर्शवला आहे. मात्र, कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन 'लॉकडाऊन'वर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
टाळेबंदीमुळे व्यवहार होणार ठप्प
गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णतः कोलमडलेल्या आहेत. छोटे-मोठे विक्रेते, व्यापारी, उद्योजक अक्षरशः हैराण आहेत. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. दैनंदिन व्यवहार सांभाळणेसुध्दा मुश्कील बनले आहे. त्यामुळे विक्रेते, व्यापारी व उद्योजकांसमोर नानाविध प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातून कसबसे सावरण्याचे प्रयत्न सुरू असताना प्रशासनाने पुन्हा संचारबंदी लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारीपेठा, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन ठप्प होणार आहे. विस्कळीत होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या निदर्शनास आणून दिले.