परभणी- 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तरीदेखील पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर शहरांमधून तब्बल 1 हजार 538 लोकांनी गैरमार्गाने जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या सर्वांना शोधून पोलिसांनी होमक्वारंटाईन केले आहे. याशिवाय पुढील काळात कुठल्याही व्यक्तीने घुसखोरी करू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 83 गावांमध्ये पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील प्रमुख व्यक्तींचे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात 14 ठिकाणी नाकेबंदी तरीही 1 हजार 538 जणांची घुसखोरी; सर्व होम क्वारंटाईन - parbhani lockdown
पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर शहरांमधून तब्बल 1 हजार 538 लोकांनी गैरमार्गाने जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या सर्वांना शोधून पोलिसांनी होमक्वारंटाईन केले आहे. याशिवाय पुढील काळात कुठल्याही व्यक्तीने घुसखोरी करू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 83 गावांमध्ये पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील प्रमुख व्यक्तींचे पथक तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोरोनाच्या दहशतीने संपूर्ण जग हादरून गेले आहे. मात्र त्याच कोरोना विषाणूपासून दूर राहिलेल्या परभणीत मागच्या गुरुवारी पुणे येथून चोरट्या मार्गाने आलेल्या एका तरुणाची 'कोरोना' चाचणी पॉसिटीव्ह निघाली. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली. विशेषतः पोलीस प्रशासनाने प्रचंड बंदोबस्त लावून देखील मोठ्या प्रमाणात अन्य शहरातून घुसखोरी सुरूच आहे. गेल्या काही दिवसात परभणी जिल्ह्यातील 14 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे, असे असले तरी चोरट्या मार्गाने तसेच नाक्यांवर पोलिसांच्या गैरहजेरीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येणाऱ्यांची संख्या आतापर्यंत 1 हजार 538 एवढी झाली आहे. या सर्वांना पोलिसांनी शोधून काढले असून त्या सर्वांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथक निगराणी ठेवून असल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली.
यापुढे घुसखोरांना आळा घालण्यासाठी परभणीच्या जिल्हा पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील अन्य जिल्ह्यांच्या सीमा असलेल्या 83 गावांवर विशेष लक्ष ठेवले आहे. या गावांच्या हद्दीत मधून परभणी जिल्ह्यात कोणीही प्रवेश करू नये, यासाठी पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकांना एकत्र करून त्यांचे पथक तयार केले आहे. प्रत्येक दोन गावांमध्ये एक पोलीस कर्मचारी देखील सातत्याने पेट्रोलिंग करणार आहे. पोलीस पथकाच्या माध्यमातून घुसखोरांना आता रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय जिल्ह्यातील 14 नाकेबंदी करण्यात आलेल्या ठिकाणांवर देखील पोलिसांनी बंदोबस्त वाढला आहे. या ठिकाणी पोलिस जवान डोळ्यात तेल घालून घुसखोरांवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात खुसखोर पकडून त्यांना विविध निर्वासित शिबिरांमध्ये ठेवण्यात आले आहे.