परभणी- शहरात गुरुवारी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने तत्काळ तीन दिवसांची संचारबंदी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजता सुरू झालेल्या बाजारपेठेत नागरिकांनी पुन्हा पहिल्यासारखी तोबा गर्दी केली. बँकांबाहेरदेखील अनुदानाची रक्कम काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली, तर दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ असल्याने कुठेही सोशल-डिस्टन्सिंग पाळल्याचे दिसून आले नाही.
अगदी सुरुवातीपासून ग्रीनझोनमध्ये राहणारा परभणी जिल्हा गुरुवारी सापडलेल्या कोरोनाग्रस्त तरुणामुळे ऑरेंज झोन मध्ये गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना 20 एप्रिलपासून व्यापार आणि उद्योगासाठी सूट देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार परभणीच्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 17 ते 19 एप्रिल या तीन दिवसीय संचारबंदीनंतर आज सोमवारी बाजारपेठ खुली करण्याचे आदेश दिले होते. अर्थात यामध्ये केवळ किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, बँका, शासकीय कार्यालय यांनाच परवानगी देण्यात आली होती. याचा कालावधी सकाळी 7 ते दुपारी 2 असा ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी केवळ आज 20 एप्रिलपुरताच आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने उद्या 21 एप्रिलपासून बाजारपेठ उघडेल की नाही? याची अनिश्चितता आहे. त्यामुळे नागरिकांनी आज सकाळी सात वाजल्यापासून बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली.