परभणी - येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत सहभागी 46 ट्रेकर्संनी कळसूबाई शिखर सर करीत हरिश्चंद्र गडावरही चढाई केली. विशेष म्हणजे यात 9 चिमुकले देखील सहभागी झाले होते.
डोळ्यांची पारणे फेडणारा अनोखा नजारा
महाराष्ट्रात पावसाने आपली हजेरी लावली आहे. अशावेळी दूरवर पसरलेली ढगांची चादर, त्यात ताठ मानेने उभे असलेले सह्याद्रीतील अभेद्य सुळके, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट ’कळसुबाई शिखर’, सभोवतालचे अभयारण्य, आदी डोळ्यांची पारणे फेडणारा अनोखा नजारा पहायचा, तर या पावसाळ्यात हरिश्चंद्रगडाला भेट द्यायला हवीच, असे भावना ट्रेकर्संनी व्यक्त केली.
37 मोठे व 9 बालगिर्यारोहक सहभागी
या पावसाळ्यात ट्रेकर्संना संधी मिळावी म्हणून ’स्वराज्य ट्रेकर्स परभणी’चे प्रमुख मार्गदर्शक राजेश्वर गरुड व माधव यादव, दीपक नागुरे यांनी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी ’कळसूबाई व हरिश्चंद्रगड ट्रेक’चे आयोजन केले होते. परभणीहून 37 मोठे व 9 बाल गिर्यारोहक 28 ऑगस्टला सकाळी रवाना झाले.
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील बारी गावात त्यांनी मुक्काम केला. दुसर्या दिवशी 29 ऑगस्टला पहाटे लवकर उठून सर्व तयारी करण्यात आली. सकाळी 7 वाजता सर्व ट्रेकर्संनी कळसूबाई शिखर चढायला प्रत्यक्ष सुरुवात केली. सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत सर्वांनीच हे अत्युच्च शिखर सर केले. शिखरावरुन निसर्ग सौंंदर्य पाहत व काही ठिकाणांना भेटी देत ही मंडळी दुपारी 2 वाजता खाली उतरायला निघाली. त्यानंतर रंधा धबधबा पाहून सर्वजध पांचनाई गावात मुक्कामी पोहोचले.
विलक्षण महत्त्व लाभलेला दुर्ग: "हरिश्चंद्र गड"
30 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता हरिश्चंद्रगड चढायला सुरुवात झाली. ज्याचा इतिहास कुतूहलजनक, तर भूगोल विस्मयकारक आहे. असा विलक्षण महत्त्व लाभलेला दुर्ग म्हणजे हरिश्चंद्रगड. या हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी चहा, नाश्ता करून ट्रेकला सुरुवात करण्यात आली. हरिश्चंद्रगडावर पोचून त्यावरील वास्तू आणि त्यांचा इतिहास समजून घेण्यात आला. हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन मंदिर, केदारेश्वराची गुंफा, काळू नदीचे उगमस्थान, भव्य कोकणकडा आदी गडावरील ठिकाणांना भेट देत तिथला इतिहास उलगडणारा हा ट्रेक अनुभवला. दुपारी 2 वाजता सर्व ट्रेकर्स गडावरून खाली उतरले आणि परतीच्या प्रवासाला निघाले.
हेही वाचा -परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली?, उद्योगमंत्री देसाईंचे खासदार जाधवांना आश्वासन
हेही वाचा -परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; बेमुदत धरणे सुरू