परभणी- लॉकडाऊननंतर डबघाईला आलेले राज्य परिवहन महामंडळ सणासुदीच्या काळात भरघोस कमाई केल्याने पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामध्ये मराठवाडा विभागात महामंडळाच्या परभणी विभागाने सर्वाधिक कमाई करत प्रथम क्रमांक राखला आहे. तर राज्यात देखील परभणी विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाला नियोजनबद्ध कारभारासह रेल्वे सेवा बंद असल्याचा फायदा मिळाल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य परिवहन महामंडळाचा कारभार ठप्प झाला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या सणांचा कालावधी लक्षात घेत नोव्हेंबर महिन्यात महामंडळाने विविध मार्गावर प्रवासी वाहतुकीकरिता कटिबध्द नियोजन केले होते. यातूनच या महिन्याअखेरपर्यंत राज्यातील इतर सर्व विभागांच्या तुलनेत या विभागाचे भारमान 51.07 पर्यंत पोहोचले. यामुळे हा विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर तर मराठवाड्यात पहिल्या स्थानावर आल्याची माहिती विभागाकडून मिळाली.
लॉकडाऊनमध्ये डबघाईला आलेले एसटी महामंडळ पूर्वपदावर 'तब्बल 10 कोटी 27 लाख 55 हजारांचे उत्पन्न'कोरोनामुळे बसची चाके थांबली होती, पण नंतर काही मार्गावर बसेस सुरू केल्या. यातच दसरा व दिवाळी हे सण आल्याने 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत परभणी विभागाने जादा वाहतुकीसह फेऱ्या वाढवून नियोजन केले. विभागांतर्गत परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी व वसमत या सात आगारातून सोडलेल्या बसेसचा लाभ प्रवाशांनी घेतला. यामुळे महिना अखेर परभणी विभागातील बसेस 35 लाख 84 हजार किमी.धावल्या. यातून तब्बल 10 कोटी 27 लाख 55 हजारांचे उत्पन्न (भारमान) मिळाले. यात विभागाला प्रति किमी. अंतरापर्यंत 27 रुपये 67 पैशांचे उत्पन्न मिळाल्याने हे भारमान टक्केवारी 51.07 पर्यंत पोहोचले. ते राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत तिसऱ्या तर मराठवाड्यात पहिल्या स्थानावर राहिले. राज्याचा विचार केला तर पालघर 58.74, रायगड 52.64 तर परभणीचे भारमान 51.07 आले असून इतर विभाग यापेक्षा कमी आहेत.
'मराठवाड्यातील अन्य विभागांची स्थिती'कमाईच्या बाबतीत परभणी विभाग हा मराठवाड्यातील इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक पुढे राहिला आहे. यात अन्य विभागांचा किलोमीटरच्या दृष्टीने आढावा घेतल्यास त्यात औरंगाबाद - 42 लाख 50 हजार किमी (भारमान- 47.42), बीड - 30 लाख 89 हजार किमी (46.04), जालना - 18 लाख 80 हजार किमी (46.69), लातूर - 39 लाख 15 हजार किमी (47.82), नांदेड - 50 लाख 33 हजार किमी (४८.३०) , उस्मानाबाद - 43 लाख 49 हजार किमी (45.56) तर परभणी - 35 लाख 84 हजार किमी (51.07) असे भारमान राहिले आहे.
'रेल्वे मार्गावर नियोजन केल्याचा झाला फायदा'परभणी विभागाला मार्चनंतर थेट नोव्हेंबर महिन्यात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कालावधीत सण-उत्सवामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेत योग्य नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मराठवाड्यातील रेल्वे मार्गावरील फेरीबाबत केलेले नियोजन फायदेशीर ठरले. त्यामुळे परभणी विभागाचे भारमान इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक राहिले. अर्थात यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याचे परभणी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.