परभणी - जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. ती महिला कोरोना संशयित होती. त्यामुळे परभणीकरांचा जीव टांगणीला लागला होता. परंतु आज त्या महिलेचा रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह आहे. यामुळे परभणीकरांचा जीव अखेर भांड्यात पडला.
परभणी तालुक्यातील, पिंपळगावाच्या एका महिलेला बुधवारी श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यात प्रथमदर्शनी कोरोनाचे लक्षणे दिसून आल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने तिला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवले होते. शिवाय दक्षता म्हणून तिच्या स्वॅबचा नमुना औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला होता. मात्र उपचार सुरू असतानाच संध्याकाळीच त्या महिलेचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी टीम डी.एम. मुगळीकर यांनी त्या महिलेचा अहवाल गुरुवारी दिवसभरात प्राप्त होईल, असे सांगितले होते. त्यानुसार काल (गुरुवार) सायंकाळपर्यंत सर्वांनी सदर महिलेच्या अहवालाची प्रतिक्षा केली पण अहवाल आला नाही. आज शुक्रवारी सकाळी देखील अहवाल न आल्याने परभणीकरांचा जीव टांगणीला लागला होता. अद्याप एकही रुग्ण न आढळलेल्या परभणीत कोरोनाची सुरुवात होते की काय? अशी शंका प्रत्येकालाच वाटत होती. परंतु आज संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने, एक प्रसिद्धीपत्रकाद्वारे, त्या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी त्या महिलेचा मृत्यू दम्यामुळे झाल्याचे जाहीर केले. यामुळे परभणीकरांचा जीव भांड्यात पडला.
हेही वाचा -'कोरोना'शी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांवर जिंतुरात पुष्पवर्षाव
हेही वाचा -कोरोनाचा कहर : शेतकऱ्याने एकरभर भेंडी केली नष्ट