परभणी - जुनी दुचाकी खरेदी करणार असाल तर काळजी घ्या. कारण, चोरांनी जुन्या दुचाकी मोठ्या प्रमाणात विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी शहरात दुचाकी चोरट्यांवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 6 दुचाकी जप्त करून आज 4 आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी गुरुवारी (२१ जानेवारी) चोरीच्या 32 दुचाकी जप्त केल्या आहेत.
दुचाकी चोरट्यांवर केलेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली. चोरट्यांनी दुचाकी परभणी शहर तसेच पूर्णा, ताडकळस, चुडावा, पालम आणि गंगाखेड या भागातून चोरल्या होत्या. या दुचाकी त्यांनी पालम येथील दोन व्यक्तींना विकल्या होत्या, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: परंपरेप्रमाणे उद्या होणार हलवा समारंभ; अर्थसंकल्पाची होणार नाही छपाई
गेल्या काही दिवसांपासून परभणी पोलिसांनी अवैध धंदे चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. विशेषतः गुन्ह्याची 100 टक्के उकल होत आहे. पोलिसांनी पाथरी येथील 4 आरोपींना गुरुवारी अटक केली. त्यांनी परभणीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधून चोरलेल्या 32 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईनंतर लागलीच आज दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी शहरातील हडको परिसरात एका आरोपीच्या घरी छापा टाकला. या छाप्यात 16 दुचाकी जप्त करत आणखी 4 आरोपींना अटक केली.
'स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती गुप्त माहिती -
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार परभणी शहरातील हडको परिसरात असलेल्या नूतन नगरातील शेख इरफान शेख जलील (वय वर्ष 20) आणि त्याचा साथीदार शेख जुनेद शेख रियाज (रा.आरामशीन जवळ वांगी रोड) या दोघांच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांची चौकशी केली असता, त्यांच्या टोळीने परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान, पूर्णा, ताडकळस, चुडावा, पालम आणि गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 16 दुचाकी चोरल्याची निष्पन्न झाले. यापैकी 5 त्यांनी कमी किमतीत परभणीत दुचाकी विकल्या आहेत. पोलिसांनी तात्काळ या पाचही मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२१: प्राप्तिकरात दिलासा मिळावा, स्टार्टअपची अपेक्षा
पालममधून 11 दुचाकींसह 2 आरोपी अटक -
दरम्यान, या टोळीने एकूण चोरलेल्या दुचाकींपैकी उर्वरित 11 दुचाकी पालम येथील मोहम्मद ताहेर चाऊस आणि सय्यद वली सय्यद या दोघांना विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पथकाने पालम येथे सदर दोघा आरोपींच्या घरी छापा टाकून 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे दुचाकी चोरांची ही एक मोठी टोळी आहे. या आरोपींच्या माध्यमातून चोरीला गेलेल्या दुचाकी मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. या मागील रॅकेटदेखील उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी व्यक्त केली.
यांनी घेतला कारवाईत सहभाग-
या कावाईला पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मार्गदर्शन केले. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव तडस, प्रभारी पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, प्रभारी पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, साईनाथ पुयड, कर्मचारी हनुमंत जेक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तूपसुंदरे, अरुण पांचाळ, आझर शेख, हरिश्चंद्र खूपसे यांनी सहभाग घेतला. कारवाईच्या पथकात पोलीस कर्मचारी दिलावर पठाण, सय्यद मोबीन, रणजित आगळे, किशोर चव्हाण, संतोष सानप, घुगे, कृष्णा शिंदे तसेच सायबर शाखेचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, रवींद्र भूमकर, रंजीत आगळे, संतोष व्यवहारे आदींचा समावेश आहे.
जुन्या दुचाकी खरेदी करताना सावधान -
दरम्यान, जुन्या दुचाकी खरेदी करताना नागरिकांनी मूळ कागदपत्रे तपासूनच व्यवहार करावा. कमी किंमतीत दुचाकी मिळत असल्याने लालसेपोटी विनाकारण अशा मोटरसायकली खरेदी करू नयेत, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक मीना यांनी केले.