परभणी - पोलिसांनी शहरातील साखला प्लॉट भागा छापा टाकून दोन गावठी पिस्तूल, 13 जिवंत काडतूस तसेच चरस व गांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 6 लाख 41 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुंडांच्या टोळ्यांना पुरवत होते शस्त्र
या संदर्भात पोलिसांना शहरातील साखला प्लॉट भागातील रेल्वे गेटजवळ शेख सोनू उर्फ शेख आमीर शेख ताहेर हा चरस गांजाचा व्यवसाय करत असल्याची खबर गुप्तहेरांकडून मिळाली होती. तसेच तो सोबत बंदूक (पिस्तूल) वापरतो आणि शहरातील काही गुंड टोळ्यांना शस्त्र आणून विकत असल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाल्याने सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह एका पथकाने त्याच्या अड्ड्यावर मंगळवारी उशिरा छापा टाकला. घराची झडती घेतली असता, या आरोपींकडून 60 हजार रुपये किंमतीचे 111 ग्रॅम चरस, 500 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत पाच हजार रुपये) तसेच चारचाकी वाहनातून 1 पिस्तूल, 13 जिवंत काडतूस मिळाली. शिवाय त्याच्या बुलेट गाडीच्या डिक्कीतून आणखी एक गावठी पिस्टल जप्त केले. या कारवाईत तीन आरोपी अटक करून, त्यांच्याकडून एकूण 6 लाख 41 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यकटेश्वर आलेवार, गुलाब बाचेवाड, फौजदार चंद्रकांत पवार, संतोष शिरसेवाड, विश्वास खोले, साईनाथ पुयड, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, नीलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, हरिश्चंद्र खुपसे, दिलावर खान पठाण, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोबीन, शेख अजहर जाफर, संतोष सानप, संजय घुगे, छगन सोनवणे, अरुण कांबळे, विष्णू भिसे, आशा सावंत, उमा पाटील आदींच्या पथकाने केली.