परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, विनाकारण दुचाकी-चारचाकीवर फिरणाऱ्यांना बेशिस्तपणा भोवला आहे. परभणी पोलिसांनी गेल्या 5 दिवसात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या लोकांविरूध्द कारवाई करत तब्बल 14 लाख 38 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 15 जणांना न्यायालयात पाठवल्याने न्यायाधिशांनी त्यांना 8 हजार 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
'लॉकडाऊन'चे सुरुवातीचे 3 महिने समाधानकारक परिस्थिती असलेल्या परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील 6 दिवसांपासून सूंपर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. पुढे रविवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी घरीच बसणे गरजेचे आहे. नियमांचे काटेकोर पालन करीत प्रशासनास सहकार्य करणेही अपेक्षित असताना अनेक नागरिक बिनबोभाट रस्त्यावर फिरत आहेत. अनेक दुकाने या काळात चालू ठेवत आपला व्यवहार सुरुळीत ठेवण्याचा प्रयत्नही करत आहेत.
मास्क न वापरता सर्रास दुचाकी-चारचाकीवरून अनेकजण विनाकारण शहरातून फेरफटका मारत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अवलंबिण्यात येत असलेल्या उपाययोजनांना खीळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचार्यांना विनकारण फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांनी विनाकारण फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू केले आहे. रस्त्यावर फिरताना मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्यांविरूध्द कारवाई करण्याचे सत्र अवलंबिले. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत या 5 दिवसात तब्बल 14 लाख 38 हजार रुपयांचा दंड पोलिस प्रशासनाने वसूल केला.