परभणी -कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होत आसल्याने देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान परभणी जिल्ह्यात आजपर्यंत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 1 हजार 900 वाहनचालकांची वाहने जप्त करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही वाहने कमीत कमी दंड आकारून सोडण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
परभणी जिल्ह्यात 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले. तेव्हापासून १७ मे पर्यंत विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांची वाहने जप्त करण्याची कारवाई जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे शहर वाहतूक शाखेमार्फत करण्यात आली. या कारवाईत आजपर्यंत 1 हजार 758 दुचाकी तर 157 चारचाकी व ऑटोरिक्षा जप्त करण्यात आले आहेत.
परंतु आज घडीला नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही सर्व जप्त वाहने कमीत कमी 200 रुपये दंड आकारून मंगळवारपासून (19 मे) सोडण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. ही वाहने सोडताना सोशल-डिस्टन्स पाळले जावे, म्हणून दिलेल्या वेळापत्रकानुसार सोडण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांनी आपले वाहन ज्या पोलीस ठाणे अथवा वाहतूक शाखेमार्फत जप्त करण्यात आले होते, तेथे वाहनाची कागदपत्रे दाखवून मास्क अथवा रुमाल बांधून गर्दी न करता आपले वाहन दिलेल्या तारखेस घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये मंगळवारी ज्या वाहनाचा शेवटचा क्रमांक 0 व 1असेल त्यांची वाहने सोडण्यात येणार आहेत. याप्रमाणेच शेवटचा क्रमांक 2 व 3 असेल ती वाहने बुधवारी तर गुरुवारी 4 व 5, शुक्रवारी 6 व 7, शनिवारी 8 व 9 क्रमांक शेवटी असणारी वाहने सोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, यापुढे ही वाहन घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळल्यास वाहन जप्तीची कारवाई पुन्हा करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.