महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीतील जलाशय अद्यापही कोरडेठाक; जिल्ह्यात 35 टक्के पावसाची तूट - परभणी news

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे तरी देखील परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक आहेत. भरपावसाळ्यात परभणीची पाणी परिस्थिती गंभीर झाली असून येणाऱ्या काळात दुष्काळाचे भयावह चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे

परभणीतील जलाशय अद्यापही कोरडेठाक

By

Published : Aug 12, 2019, 1:33 PM IST

परभणी -पावसाअभावी परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी एकाही धरणात किंवा प्रकल्पात एक टक्का सुद्धा पाणीसाठा होऊ शकलेला नाही. भरपावसाळ्यात परभणीची पाणी परिस्थिती गंभीर झाली असून येणाऱ्या काळात दुष्काळाचे चित्र निर्माण होण्याची भीती आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना वाटत आहे.

परभणीतील जलाशय अद्यापही कोरडेठाक

परभणीतील पाणी परिस्थिती गंभीर

जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 35.1 टक्का पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आजपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाच्या 65.2 टक्के पाऊस झाला आहे. अजूनही जिल्ह्यात 35 टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे उर्वरित दोन महिन्याच्या कालावधीत 65 टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे.

जिल्ह्यात लघु व मध्यम तसेच मोठे असे 14 प्रकल्प आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने येलदरी व निम्न दुधना या दोन मोठ्या प्रकल्पांचा समावेश होतो. या दोन्ही प्रकल्पात सध्या मृत साठा आहे. याशिवाय ढालेगाव, डिग्रस, मुळी, मासोळी, करपरा, वडाळी, कवडा, मांडवी, झरी तलाव आणि तांदुळवाडी आदी सर्वच प्रकल्प कोरडेठाक आहेत. एकाही प्रकल्पामध्ये गेल्या दोन महिन्यात पाणीसाठा झालेला नाहीये. पाण्याची केवळ डबकी दिसून येत असून हे पाणी जनावरांना पिण्यासाठी सुद्धा पुरणार नाही.

पाऊस न झाल्यास येणाऱ्या काळात दुष्काळाची भीती

परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 774.62 मिलिमीटर एवढी आहे, परंतु 2012 पासून यावर्षीपर्यंत केवळ 2016 चा अपवाद वगळता एकदाही या पावसाने आपली सरासरी ओलांडली नाही. उलट प्रत्येक वर्षी पावसाची सरासरी कमी होत गेली आहे. परिणामी गेल्या सात-आठ वर्षात परभणीकर दुष्काळाचा सामना करत आहेत. पावसाअभावी पिकांचे उत्पन्न होत नाही. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊन आर्थिक मंदी निर्माण झाली आहे.

एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर भागात धो-धो पाऊस पडत आहे. पूर परिस्थितीने त्याठिकाणचे नागरिक हैराण झाले आहेत. याउलट मराठवाड्यात मात्र पावसाने प्रचंड उघडीप दिली आहे. परभणी जिल्ह्यात भयंकर परिस्थिती आहे. त्यातच गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पडणारा पाऊस देखील बंद झाला आहे. 8 ऑगस्ट रोजी शेवटचा रिमझिम पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाचा थेंबही नाही. उलट वातावरणातील उष्णता वाढत चालली आहे. याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details