परभणी - जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी ज्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय नियुक्तीवरून आपला राजीनामा सादर केला, त्यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी खासदार जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिंतूरात राष्ट्रवादीचा तर बोरीत शिवसेनेचा प्रशासक नेमण्याचे वरिष्ठ पातळीवरूनच ठरले होते; मग पुन्हा जिंतूरात हस्तक्षेप करून खासदार संजय जाधव हे त्या मतदारसंघात भाजपला पोषक वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच खासदारांनी भाजपला मदत करायची, की रोखायचे हे आधी ठरवावे असेही दुर्राणी यावेळी म्हणाले.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय प्रशासक नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपला राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. यावरून महाघाडीत एकच खळबळ उडाली; मात्र राष्ट्रवादीवर झालेल्या आरोपांमुळे यासंदर्भात जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी तसेच माजी आमदार विजय भांबळे आणि राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आमदार दुर्राणी यांनी खासदारांवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जिंतूरात 13 जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. जिंतूर आणि सेलू या दोन्ही पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शिवाय त्या ठिकाणी केवळ अकराशे मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव झाला आहे, असे असताना ते जिंतूर बाजार समितीच्या प्रशासकीय नियुकत्यांवरून दबाव टाकण्याचा प्रयत्न का करत आहेत?
भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी जिंतूर विधानसभेत विजय मिळवून भाजपचे जिल्ह्यात खाते उघडले आहे. मग खासदारांना अशा पद्धतीने हस्तक्षेप करून त्या ठिकाणी भाजपला पोषक वातावरण तयार करण्याचा तयार करायचे आहे का? असा सवाल दुर्राणी यांनी उपस्थित केला. तसेच राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यापासून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे सर्व पक्ष मिळून मिसळून काम करत आहेत. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलाबल असताना देखील आम्ही शिवसेनेला सोबत घेतले. एवढेच नाही तर त्यांना सभापती पदही दिले. असे असताना खासदार मात्र ज्या पाथरीत 25 वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे, त्या ठिकाणच्या बाजार समितीत हस्तक्षेप करतात. सोनपेठमध्ये राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांची यांचे वर्चस्व असताना देखील त्या ठिकाणी त्यांना हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. खासदारांना जर पुन्हा निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी दूरदृष्टी ने विचार करावा.