परभणी - आम्हाला वॉटरग्रीड योजना हवी आहे. तसेच उदगीरला नवीन जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी भूमिका मांडत राज्यमंत्री संजय बनसोडेंनी मांडली आहे. पूर्णा येथील बौद्ध विहारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे हे शहरात आले होते. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत संवाद साधला.
शुक्रवारी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कुचकामी असल्याचे सांगून ती बंद करण्याची भूमिका मांडली होती. तसेच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करणे सोपे नसते, असे सांगून कुठलाही प्रस्ताव नसल्याचे सांगितले होते. मात्र, यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचेच राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी फडणवीस सरकारने आणलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजना चांगली आहे. ती आम्हाला हवी आहे. तसेच उदगीर हा जिल्हा झालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.
हेही वाचा - वर्ध्यात तळघरामध्ये दारूनिर्मिती, पोलिसांनी ३ हजार लीटर सडवा केला नष्ट
राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले, मराठवाड्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने आणलेली ही योजना अत्यंत चांगली आहे. याचा फायदा संपूर्ण मराठवाड्याला होणार आहे. ही योजना जर अंमलात आणली गेली, तर मराठवाड्याचा दुष्काळ पूर्णतः संपणार आहे. त्यामुळे आम्ही मराठवाड्यातील मंत्री, सर्व आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देखील भेटून त्यांना या योजनेची माहिती देऊ. ती कशी चांगली आहे, हे पटवून सांगू, असे देखील संजय बनसोडे म्हणाले.
दरम्यान, उदगीर या नवीन जिल्हा निर्मितीसाठी संजय बनसोडे यांनी प्रयत्न चालवले आहेत. उदगीर जिल्हा व्हावा, ही जुनी मागणी आहे. कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमा रेषेवर असलेले हे ऐतिहासिक शहर आहे. पानिपतची लढाई येथून सुरू झाली होती. हे शहर शैक्षणिक, सांस्कृतिक शहर आहे. लातूरनंतर असलेले मोठे शहर आहे. त्यामुळे उदगीर हा जिल्हा व्हावा, अशी नागरिकांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले. राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीर येथील आमदार आहेत.
हेही वाचा -'अजित पवारांचा नेम अचूक, मात्र, चुकेल या भीतीनं मी नेम लावलाच नाही'
आता राष्ट्रवादीच्याच मराठवाड्यातील मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध मांडलेली ही भूमिका चर्चेचा विषय बनणार आहे.