महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी बाजारपेठेत पुन्हा गर्दी, 'सोशल-डिस्टन्सिंग' धाब्यावर - परभणी कोरोना अपडेट

गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी बसू नये, असे लेखी आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाचे नियंत्रण सुटताच पुन्हा परभणीच्या बाजारपेठेत 'जत्रा' भरली आहे. विक्रेते आणि ग्राहक देखील सोशल डिस्टन्सिंग अक्षरशः धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे.

Parbhani market
परभणी बाजारपेठ

By

Published : Apr 11, 2020, 2:55 PM IST

परभणी -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून'सोशल डिस्टन्सिंग' पाळणे अत्यावश्यक आहे. मात्र, परभणीत याच सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन दिवस बाजारपेठेतील भाजीपाला आणि फळविक्रेते गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विकू लागले. मात्र, प्रशासनाचे नियंत्रण सुटताच पुन्हा परभणीच्या बाजारपेठेत 'जत्रा' भरली आहे. विक्रेते आणि ग्राहक देखील सोशल डिस्टन्सिंग अक्षरशः धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन, प्रशासन, सामाजिक संस्था आणि माध्यमे सर्वच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिक काही ऐकायला तयार नाहीत. असाच प्रकार परभणी शहरासह जिल्ह्यातील काही बँकांसमोर आणि बाजारपेठेत दिसून येत आहे. परभणी शहरातील गांधी पार्क, क्रांती चौक, कडबी मंडई या प्रमुख भाजीपाला, दूध तसेच किराणा दुकानाच्या बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच बाजारपेठा उघडत असल्याने नागरिक या ठिकाणी तोबा गर्दी करत आहेत. पोलीस किंवा महापालिकेचे कर्मचारी आल्यानंतर ते ग्राहकांना शिस्तीत उभे करतात. परंतु ते जाताच काही वेळात ही शिस्त बिघडून जाते. लॉकडाऊनच्या सुरुवातीला मनपाने काही दुकानासमोर आखून दिलेले रांगोळी आणि खडूच्या चौकटी सध्या मिटल्याचे दिसून येते. परिणामी नागरिक बाजारात भाजीपाला, किराणा घेण्यासाठी कसलीच शिस्त पाळताना दिसत नाहीत.

दोन दिवसात प्रशासनाचे नियंत्रण सुटले

गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काही दिवसांपूर्वी बाजारपेठेत भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी बसू नये, असे लेखी आदेश दिले आहेत. शिवाय बँकांच्या जनधन खात्यामध्ये जमा झालेले पैसे 14 एप्रिलनंतर काढावेत, असेही आदेश दिले होते. परंतु या आदेशाचे पालन दोन दिवसच झाल्याचे दिसून आले. पुन्हा शुक्रवारपासून प्रशासनाचे नियंत्रण सुटले आणि ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता बाजारपेठेचे कशा पद्धतीने नियोजन करावे, यावर प्रशासनाला पुनर्विचार करावा लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details