महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नळजोडणीमध्ये परभणी जिल्हा मराठवाड्यात अव्वल - Parbhani District Latest News

केंद्र शासनाच्या जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत 2020-21 साठी ठरवून देण्यात आलेले नळजोडणीचे उद्दिष्ट परभणी जिल्ह्याने शंभर टक्के पूर्ण करून, मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्यायोग्य शुध्द पाणी नळाद्वारे पुरविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे.

नळजोडणीमध्ये परभणी जिल्हा मराठवाड्यात अव्वल
नळजोडणीमध्ये परभणी जिल्हा मराठवाड्यात अव्वल

By

Published : Jan 9, 2021, 9:53 PM IST

परभणी -केंद्र शासनाच्या जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत 2020-21 साठी ठरवून देण्यात आलेले नळजोडणीचे उद्दिष्ट परभणी जिल्ह्याने शंभर टक्के पूर्ण करून, मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्यायोग्य शुध्द पाणी नळाद्वारे पुरविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे.

68 हजार 604 नळजोडणीचे होते उद्दिष्ट

सन 2020-21 या वर्षामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत शासनामार्फत परभणी जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी 68 हजार 604 नळजोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट परभणी जिल्ह्याने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी स्वच्छ भारत मिशन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि सर्व तालुक्यातील संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाचे पाणी देण्याचे उद्दीष्ट

'हर घर नल से जल' या योजनेद्वारे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याची मोहिम केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शासकीय योजनाद्वारे व खासगी बोरवेलद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्याचे केंद्र शासनाचे उद्दीष्ट आहे. यामध्ये 15 वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या निधीतून नळ जोडणीची आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत.

यांचे योगदान ठरले महत्त्वपूर्ण

नळ जोडणी बाबत परभणी जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता गंगाधर यंबडवार यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सोनपेठचे समूह समन्वयक विजय प्रधान यांचा गौरव केला. यावेळी शाखा अभियंता गिराम यांची उपस्थिती होती. दरम्यान, वैयक्तिक नळ जोडणीच्या या मोहिमेमध्ये स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. पवार, उप अभियंता गंगाधर यंबडवार, उप अभियंता माथेकर, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, सर्व शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व तालुक्यांचे गट समन्वयक व समूह समन्वयक आणि जिल्हा कक्षातील सल्लागार यांनी योगदान दिल्याची माहिती स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details